आचार्य शंकराचार्य महाराज अयोध्या यांनी शनिवारी (२३ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच हिंदू राष्ट्र व इतर सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी आचार्य शंकराचार्यांनी “अण्णा तुम्ही अयोध्येला या, आम्हाला खूप आनंद होईल”, असं म्हणत अण्णा हजारेंना अयोध्या भेटीचं निमंत्रण दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य शंकराचार्य महाराज म्हणाले, “अण्णा तुम्ही प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीत यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही अयोध्येला या, आम्हाला खूप आनंद होईल.”

या भेटीत अण्णा हजारे यांनीही आचार्य शंकराचार्य यांना त्यांनी केलेली आंदोलनं आणि माहिती अधिकारापासून त्यांच्या विविध कामांची माहिती दिली. भेटीनंतर अण्णा हजारेंनी स्वतः गाडीपर्यंत जाऊन आचार्य शंकराचार्यांना निरोप दिला.

“तुमचे आशीर्वाद असू द्या”

दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला होता. तसेच तुमचे आशीर्वाद असू द्या, अशी हात जोडून विनंती केली होती.

एकनाथ शिंदे यांनी या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तसेच मी एकनाथ शिंदे बोलत असल्याचं सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना हात जोडून तुमचे आशीर्वाद असू द्या. तुमचं मार्गदर्शन असू द्या अशी मागणी केली. यावर अण्णा हजारे यांनी ईश्वराचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याचीच ही पावती असल्याचंही हजारेंनी नमूद केलं होतं.

हेही वाचा : “अण्णा जेवायला जेवायला…”, उपोषणावर केलेलं दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ट्वीट चर्चेत

एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना तुमचं मार्गदर्शन असू द्या आणि जेव्हा तुम्हाला काही वाटेल तेव्हा आदेश करत जा, सूचना करत जा, असंही सांगितलं. “आम्ही राज्याच्या हिताचं काम करू. देवेंद्र फडणवीस, मी व आमचे सहकारी जनतेला अपेक्षित असलेलं काम करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा.” एकनाथ शिंदेंसोबतच्या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आणि धन्यवाद देखील मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya shankaracharya meet anna hazare invite him to visit ayodhya pbs