हिंगोली : संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित अण्णासाहेब टाकळगव्हाणकर प्रतिष्ठान व गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित अमृततुल्य व्यक्तिमत्त्वांचा कृतज्ञतापर गौरवसोहळा व समृद्ध विचारांचा मेळा कार्यक्रमात गौरव करण्यात आलेल्या गौरवमूर्तींनी आपल्या भाषणातून समृद्ध विचारांची पेरणी केल्याने संपूर्ण सभागृह समृद्ध विचाराने न्हाहून निघाले होते.
हिंगोली येथील एका हॉटेलमध्ये समृद्ध विचारांचा मेळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शतायुषी स्वातंत्र्यसेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर, एमजीएमचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, प्राचार्य डॉ. बंकटलाल जाजू -आदर्श महाविद्यालयाचे डॉ. जयनारायण मंत्री, प्रा. विलास वैद्य, पत्रकार तुकाराम झाडे या मान्यवरांचा कृतज्ञतापर गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ॲड. पी. के. पुरी आदीची उपस्थिती होती.
गौरवपर भाषणातून बोलताना माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात महात्मा गांधींमुळे मिळालेली प्रेरणा स्वतंत्र प्राप्तीनंतर मराठवाडा, मुक्तीसंग्रामनंतर सत्यशोधकी विचार महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचे विचार समाजात पेरले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख या व्यक्तींचा माणिकराव टाकळगव्हाणकर यांना प्रत्यक्ष सहभागही लाभला. आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या प्रश्नावर बोलताना राजकारणी व प्रशासनातील वाढती भ्रष्टाचारी वृत्ती, संपत्तीचा हव्यास, शेतकऱ्याची निंदा या सर्व बाबींमुळे खूप यातना होतात. आजच्यापेक्षा निजामाचाच काळ बरा होता की काय, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अण्णाराव गुरुजींचा स्नेह आम्हाला लाभला, आम्ही भाग्यवान आहोत. त्यांचे ज्ञान, कीर्ती याला समाजाने योग्य तसा न्याय दिला नाही, याची खंत आजही आहे. त्यांनी जमवलेली अत्यंत प्राचीन नाणी आणि त्याचा संग्रह करणे हे अतिशय अवघड गोष्ट होती. ती त्यांचा पुत्र संजयने आजपर्यंत सांभाळले. हे मोठे कौशल्याचे काम असल्याचे ते म्हणाले. मात्र, नाणेसंग्रह कुठलाही मोबदला न घेता आमच्याकडे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी दिला, ते आम्ही आमचे भाग्य समजतो. वडिलांच्या अशा स्मृती जिवंत ठेवणारा संजय हा एक आदर्श मुलगा असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रनिर्मितीतील लोकांचे भान ठेवणारा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून संजय टाकळगव्हाणकर यांचे कमल किशोर यांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास बोरसे व विठ्ठल सोळंके यांनी केले.
अन् जिल्हाधिकारी म्हणाले, ‘स्वीट सॅटर्डे’…
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाला येण्यापूर्वीच मी फक्त अर्धा तास उपस्थित राहीन, असे सांगितले होते. मात्र, कार्यक्रमातील वैचारिक मंथनाने ते भारावून गेले आणि तब्बल दीड तास थांबले. त्यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस ‘स्वीट सॅटर्डे’ असल्याचा उल्लेख केला. फोटो ओळी : हिंगोलीत पार पडलेल्या अमृततुल्य व्यक्तिमत्त्वांचा कृतज्ञतापर गौरव करण्यात आला. यावेळी कमलकिशोर कदम यांचा सत्कार करताना जयप्रकाश दांडेगावकर व इतर. माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम मार्गदर्शन करताना व्यासपीठावर मान्यवर मंडळी.