डॉ.वैशंपायन स्मृती वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांची बदली झाली तरी त्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी कोल्हाटी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला लावणी कलावंतांनी सहभाग घेतला होता.
पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचे आयोजन संत लाख्या कोल्हाटी (भातू) विकास सामाजिक संस्थेने केले होते. संस्थेचे अध्यक्ष अरूण मुसळे व भटक्या विमुक्त जमातीचे नेते, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड व अॅड. अरूण जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
पावसाच्या सरी अंगावर झेलत, डॉ. किरण जाधव अमर रहे, कोल्हाटी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अधिष्ठातांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला तेव्हा त्याचे रुपांतर सभेत झाले. या वेळी बोलताना उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी, मृत डॉ. किरण जाधव यांच्या वारसांना केवळ पाच लाखांची नव्हे तर पाच कोटींची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्यांना निवासस्थान व नोकरीही दिली पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी प्रा. सुषमा अंधारे, किरण अंधारे, अनिल जाधव, अॅड. अरूण जाधव आदींची घणाघाती भाषणे झाली. सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांची शासनाने लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली असली तरी लातूर येथे डॉ. शिंदे यांना रुजू होऊ देणार नाही, असा इशारा या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. अरूण मुसळे यांनी आम्ही उघडेच आहोत, आता तुम्हाला आम्ही उघडे पाडू, असा इशारा देताना समाज व्यवस्थेवर हल्लाबोल केला. अॅड. अरूण जाधव यांनी डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पहिला मोर्चा जामखेड येथे काढल्यानंतर आता सोलापूरला व लवकरच लातूर येथेही हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
मार्डचा संप मागे
दरम्यान, डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने सुरू केलेले सामूहिक रजा आंदोलन बुधवारी सहाव्या दिवशी मागे घेतले. मुंबईत वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेतल्याचे मार्डचे सचिव डॉ. पूनित छाजेड यांनी सांगितले. मृत डॉ. किरण जाधव यांच्या वारसदारांना मार्डच्यावतीने चार हजार निवासी डॉक्टरांचे प्रत्येकी एका दिवसाचे १३५० रुपये विद्यावेतन मिळून सुमारे ५२ लाखांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा