लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी १३७ सार्वजनिक मंडळांवर आणि प्रखर लेझर प्रकाश किरणांचा वापर केल्याप्रकरणी १० मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

जिल्ह्यात गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दोन्ही सण एकाच वेळी येणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाकडून गणेश मंडळांच्या ३१७, मूर्तिकारांच्या २४, शांतता समितीच्या ५४, मोहल्ला समितीच्या ३०, पोलीस मित्रांच्या ४४ बैठका घेण्यात आल्या. तसेच दंगा काबू पथकाची विविध शहरांत २८ प्रात्यक्षिके आणि पथसंचलन ४४ घेण्यात आले.

आणखी वाचा-दिवसभर ऊन, संध्याकाळी पावसाची सर आणि पहाटे धुके!

जिल्ह्यात ५ हजार ४७३ मंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करून मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लघंन केल्याचे आढळून आलेल्या १३७ मंडळांवर कारवाई करण्यात आली. तसेच मिरवणुकीत मानवी शरीरास अपायकारक ठरणाऱ्या लेझर किरण व प्लाझ्मा प्रकाश किरणांचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला असताना बंदी आदेश मोडून वापर करणाऱ्या १० गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रकाश यंत्रणेचा वापर करणारे मालक यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.