गेल्या दोन-तीन महिन्यांत शहरात घडलेल्या खूनसत्रामागे भिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यावर भिकाऱ्यांना पकडण्याची पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. आत्तापर्यंत या कारवाईत पोलिसांच्या हाती दहा भिकारी लागले आहेत. कोल्हापूर शहर हादरवून टाकणाऱ्या सीरियल किलर प्रकरणात एका भिकाऱ्याचा मुख्यत्वे करून हात गुंतला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता शहर पोलिसांनी भिकाऱ्यांचा धसका घेतला आहे. तर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे भिकारी भयभीत झाले असून पोलीस व भिकारी हे एकमेकांना पाण्यात पाहू लागले असून ते एकमेकांपासून सावध पवित्रा घेऊ लागले आहेत.
आत्तापर्यंत पोलिसांनी १० भिकाऱ्यांना पकडून न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे व सातारा येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पुनर्वसनासाठी रवानगी केली आहे. या कारवाईमुळे शहरातील पर्यटक, भाविक व वर्दळीच्या ठिकाणापासून भिकाऱ्यांनी धूम ठोकली आहे. सध्या त्यांनी आपला मुक्काम जिल्हय़ाबाहेर सांगली, मिरज येथे हलविला आहे. परिणामी शहरातील महालक्ष्मी मंदिर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, भवानी मंडप अशा ठिकाणी भिकारी दिसणे दुर्मिळ बनले आहे. काल संकष्टी असतानाही गणेश मंदिरासमोर तर गुरुवार असतानाही दत्त मंदिरासमोर भिकाऱ्यांची रांग गायब झाल्याचे प्रथमच दिसून आले आहे.    
कोल्हापूर हे उद्योग, कृषी, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील राज्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. करवीरनिवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा या प्रमुख देवस्थानांमुळे शहरात बारमाही भाविकांची वर्दळ असते. तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक गड-किल्ले, अभयारण्य, हिल स्टेशन अशा विविध प्रकारच्या पर्यटनानिमित्त पर्यटकांचा राबता या शहरात सदोदित असतो. यामुळे भिकाऱ्यांसाठी कोल्हापूर शहर म्हणजे एक पर्वणीच ठरले आहे. आर्थिकदृष्टय़ा कोल्हापूर जिल्हा सक्षम असल्याने स्थानिक नागरिकांकडून तसेच बाहेरून येणाऱ्या विविध प्रकारच्या अभ्यासगटांकडून हमखास भिक्षा मिळण्याची खात्री भिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी, कोल्हापुरातील मंदिरे, मध्यवर्ती ठिकाणे येथे भिकाऱ्यांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. भिक्षा मागण्याच्या त्यांच्या एकसारख्या तगाद्यामुळे पादचारी, वाहनधारक हैराण झाले आहेत. सीरियल किलर प्रकरणातील आरोपी हे भिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भिकाऱ्यांवर कारवाई होऊ लागल्याने त्यांनी शहरातून पळ काढला आहे. या कारवाईमुळे कोल्हापूरकरांची भिकाऱ्यांच्या त्रासापासून सुटका झाली आहे.    
गेल्या दोन-तीन महिन्यांत शहरातील भिकारी, बेवारस यांचे खून होण्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे यातील तीन खून दिलीप लहेरिया या भिकाऱ्यानेच केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याची धास्ती पोलिसांनी घेतली आहे. शहरात घडलेल्या सर्वच खुनांमागे भिकारीच आहेत का, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी काळजीपूर्वक चालविले आहे. यातूनच मंदिर, रस्ते, बसस्थानक येथे भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी चालविली आहे. आत्तापर्यंत या कारवाईत पोलिसांच्या हाती दहा भिकारी लागले आहेत.    
पकडण्यात आलेल्या दहा भिकाऱ्यांना न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाच्या संमतीने त्यांना पुणे व सातारा येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे. भटकण्याची सवय, मद्यप्राशनाचे व्यसन आणि अनेक आजारांनी ग्रासलेल्या या भिकाऱ्यांना स्वीकार केंद्रात नव्या पद्धतीने बंदिस्तजगतात वावरताना वेगळे अनुभव घ्यावे लागणार आहेत. यातील काही भिकारी मनोरुग्ण असल्याचेही दिसून आल्याने त्यांचा सांभाळ करताना स्वीकार केंद्रातील प्रशासनाला नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.     
शहरात घरगुती भिकारी नावाचा एक प्रकारही अस्तित्वात आहे. या भिकाऱ्यांची उपनगरामध्ये कुटुंब व स्वमालकीची घरे आहेत. आजारांनी जर्जर झालेली, अपंगत्व असलेल्या या भिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील लोक महालक्ष्मी व अन्य मंदिराच्या ठिकाणी असलेल्या विशिष्ट जागेवर आणून सोडतात आणि सायंकाळी पुन्हा घरी घेऊन जातात. या भिकाऱ्यांना मिळणारे उत्पन्न चांगले असल्याने कुटुंबात त्यांना चांगली वागणूक मिळते. त्यांच्या जोडीला बेवारस भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. मिळालेली प्राप्ती हे भिकारी नशा-पान व चैन करून संपवत असतात. हे कमी की काय म्हणून रेल्वेने कोल्हापुरात येऊन आदळणाऱ्या भिकाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. विशेषत: गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा तसेच दिवाळी व उन्हाळी सुटी या कालावधीत करवीरनगरीत पर्यटक, भाविकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती असते. हीच कमाईची खरी संधी असल्याचे साधून या कालावधीत भिकाऱ्यांच्या एकामागून एक तुकडय़ा शहरात दाखल होत असतात. कमाईचे हमखास ठिकाण असलेल्या जागी त्यांचा भीक मागण्याचा उद्योग सुरू असतो. अनेकदा तर भीक मिळावी यासाठी भिकाऱ्यांकडून इतका ससेमिरा सुरू असतो की लोक अगदी वैतागून जातात. या भिकाऱ्यांचा उच्छाद थांबावा अशा संतापजनक प्रतिक्रिया उमटत असतात. याची नोंद मात्र प्रशासनाकडून घेतली जात नाही. यामुळे नागरिक आणखीच संत्रस्त झालेले असतात.    
तथापि पोलिसांनी आता भिकाऱ्यांवर कारवाई सुरू केल्याने नागरिकांना सुंठेवाचून खोकला गेल्याचे समाधान मिळत आहे. शहरातील मंदिरे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, रंकाळा तलाव या ठिकाणचा भिकाऱ्यांचा वावर आता जवळपास संपुष्टात आला आहे. रस्तोरस्ती दिसणारे भिकारी आता दिसेनासे झाले आहेत. भिकाऱ्यांना अन्नदान करावे, असा हेतू बाळगणाऱ्या धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना भिकारी मिळत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे, ती वेगळीच. एकूणच शहरातील भिकाऱ्यांनी शहरातून पळ काढला असून त्यांनी आपला मुक्काम सांगली, मिरज अशा ठिकाणी हलविल्याचे दिसून येत आहे.
सीरियल किलरचा केंद्रबिंदू
कोल्हापुरात डोक्यात प्रहार करून खून करण्याचे प्रकार वाढल्याने पोलीस यंत्रणेची भंबेरी उडाली होती. त्यांनी अहोरात्र गस्त सुरू ठेवल्यावर दिलीप लहेरिया हा आरोपी हाती लागला आहे. आत्तापर्यंत त्याने तीन खून केल्याची कबुली दिली आहे. शिवाय मिरज येथे झालेल्या दोन खुनांचा संशयही त्याच्यावर आहे. लहेरिया हा मूळचा छत्तीसगड राज्यातील असल्याने त्याच्या मूळ गावी आज पोलिसांचे पथक पोहोचले आहे. त्याने आणखी कोणत्या भागात खून केले आहेत का याचा शोधही पथक घेणार आहे. त्याचबरोबर आणखी कोणी भिकाऱ्यांनी खून व तत्सम गुन्हा केला आहे का, यावरही पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली असून भिकाऱ्यांवर त्यांची नजर आहे.