लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : मद्यपी वाहनचालकांवर रायगड पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यां ८२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतुक पोलीसांनी व्यापक कारवाई करत मद्यपी वाहन चालकांची झिंग उतरवली आहे.
३१ डिसेंबर रोजी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला होता. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मद्यपी वाहन चालविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
आणखी वाचा-बंदुकीचा परवाना मिळविण्यासाठी सरपंचाची अशीही बनवाबनवी; स्वतःच घडवून आणला जीवघेणा हल्ला
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने जिल्ह्यात कारवाईसाठी पोलीसांकडून १८ ठिकाणी ब्रेथ अँनलाझर मशीन तैनात ठेवण्यात आली होती. या ठिकाणी नाका बंदी करून पोलीसांनी मद्यपी वाहन चालकांची तपासणी केली. यात ८२ जण मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यातील तरतुदी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात महाड विभागात सर्वाधिक २४, पेण विभागात १५, अलिबाग विभागात १०, खालापूर विभागात ११, रोहा विभागात ९, माणगाव विभागात ६, कर्जत विभागात ३ तर श्रीवर्धन विभागात ३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या शिवाय नाताळ सणापासून मागील सात दिवसात वाहतुक पोलीसांनी व्यापक कारवाई करत ५ हजार १२८ जणांविरोधात वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोटर सायकल वरून तिघे प्रवास करणाऱ्यां १६२ जणांवर, विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या १९६ जणांवर , तर विना सिट बेल्ट वाहन चालवणाऱ्या ८२३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षात मद्यपी वाहन चालकांवर झालेली कारवाई
साल | दाखल गुन्हे |
२०२१ | ४७ |
२०२२ | ७४ |
२०२३ | ९५ |
२०२५ | १८३ |
वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात एकूण दाखल गुन्हे
सन | दाखल गुन्हे | वसूल दंड |
२०२३ | १ लाख ४ हजार ४७७ | ६ कोटी ८४ लाख ५२ हजार ८०० |
२०२४ | १ लाख ३४ हजार | १० कोटी ८५ लाख ९४ हजार ३५० |