अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी सोमवारी बंडखोरी केलेले कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व सरचिटणीस सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. प्रत्युत्तरादाखल अजित पवार गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले व तेथे तटकरे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे संघर्ष अटळ आहे. रविवारी शपथ घेतलेल्या नऊ जणांना अपात्र ठरविण्याकरिता जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे याचिका दाखल करताच पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गटानेही अर्ज केला. मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता बंडखोरांवर कारवाईचा सपाटा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मूळ पक्षाने लावला आहे. प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदावरून तर सुनील तटकरे यांची सरचिटणीसपदावरून हकालपट्टी केल्याचे पक्षाने जाहीर केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाने बंड करणाऱ्या अजित पवार समर्थकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी नऊ मंत्र्यांना अपात्र ठरवावे म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर केला. तर शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दलही अनेकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  उपाध्यक्ष संजय खोडके,  सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अकोल्याचे शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी सूरज चव्हाण, सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष जुबेर बागवान, जळगाव युवक जिल्हाध्यक्ष रिवद्र नाना पाटील, बीड जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर, नाशिकचे अंबादास खैरे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अविनाश धायगुडे, युवक प्रदेश सरचिटणीस जगदीश पंचबुद्धे, युवक सचिव श्रीकांत शिंदे यांना पक्षातून डच्चू देण्यात आला आहे.

पक्ष मुख्यालयावर ‘पाळत’

अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाच्या मुख्यालयावर त्यांच्या गटाने ताबा घेऊ नये, यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गट सावध झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे दिवसभर मुख्यालयात उपस्थित होत्या. कार्यकर्तेही मोठय़ा प्रमाणावर जमले होते.

अजित पवारांकडून संघटनात्मक फेरबदल; तटकरे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याचे सोमवारी जाहीर केले. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणाही करण्यात आली. अजित पवारांबरोबर गेलेले कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अनेक पदांवरील नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान दिले आहे. अजित पवार यांची विधिमंडळ गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून प्रतोदपदी अनिल पाटील कायम राहणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर तर युवकच्या अध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती पटेल यांनी जाहीर केली. प्रवक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी, संजय तटकरे, उमेश पाटील, आनंद परांजपे व सूरज चव्हाण यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. बहुसंख्य आमदारांचा निर्णयाला पाठिंबा असल्याचा दावा पटेल यांनी यावेळी केला असला तरी नेमका आकडा मात्र त्यांनी सांगितला नाही.

मतदारसंघातील प्रश्न, निधीचा प्रश्न, खोळंबलेली कामे याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. यावर बहुसंख्य आमदारांचे एकमत झाले आहे, असा दावा अजित पवार यांनीही केला. आपण २०१४ ते २०१८ या काळात प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाचा विस्तार केला होता. त्याप्रमाणे यापुढेही पक्षाच्या विस्तारासाठी झटणार आहे, असे तटकरे यांनी जाहीर केले. तर आज गुरूपौर्णिमा असल्याने आमचे गुरू शरद पवार हे आम्ही घेतलेल्या निर्णयाला होकार देतील, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती केली होती. २०२१ मध्ये पाटील यांना मीच मुदतवाढ दिली होती. याच अधिकारात मी पाटील यांना बदलून तटकरे यांची नियुक्ती करीत आहे. – प्रफुल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Story img Loader