लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा, वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान रस्त्यावरच डंपर मधील वाळू ओतून पळ काढण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. तहसीलदार वर्षा झालटे यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.

अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात ऍक्शन मोडवर आलेल्या मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गांवर सायंकाळी एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले.

मालवण च्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली. विना पास वाळू वाहतूक करणारे सहा डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. तर करवाईच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करणारा गोवा पासिंगचा एक डंपर सागरी महामार्गांवर रस्त्याच्या कडेला कलंडला होता. तोही ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच दोन डंपर चालकांनी महामार्गांवर वाळू ओतली व ते पळून गेले. अशी माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली.

खाडीपात्रात वाळू उपसा टेंडर दिली असतानाही अनधिकृत पणे विनापरवाना वाळू वाहतूक करणारे हे सर्व डंपर असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहितीही तहसीलदार यांनी दिली.