सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर भेटीप्रसंगी शासनाची अधिकृत डीव्ही मोटार न वापरता भाजपच्या एका कार्यकर्त्यांची विचित्र क्रमांक असलेल्या आलिशान मोटारीचा वापर केला. या संदर्भात टीका होताच अखेर प्रशासनाला संबंधित मोटारमालक व चालकावर खटला दाखल करणे भाग पडले.
सहकारमंत्री पाटील हे सोलापूर जिल्ह्यत अक्कलकोट, बार्शी येथील कार्यक्रमांसाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्यांच्या टोयाटो फॉच्र्युनर मोटारीचा वापर केला. या मोटारीचा क्रमांक एमएच १३ सीएफ ८११० असा असताना तो आकर्षक पध्दतीने ‘एमएच १३ सीएफ बीजेपी’ असा दर्शविणारा लिहिला होता. कायद्याचे हे उल्लंघन होते. यासंदर्भात टीका सुरू झाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाई करणे भाग पडले. मोटारमालक रमेश दत्तात्रेय मुळे (रा.बार्शी) व चालक किशोर राजेंद्र कोळी (रा. तावडी, ता. बार्शी) यांच्यावर मोटार वाहन अधिनियम ५०-१७७ अन्वये कारवाई करण्यात आली.