रुग्णशय्येवर असलेल्या छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयाच्या गैरव्यवस्थेवर बुधवारी झालेल्या चच्रेवेळी अधिष्ठाता दशरथ कोठुळे, जिल्हा शल्यचिकित्सक आर. सी. चौगुले यांना सी. पी. आर. बचाव कृती समितीने धारेवर धरले. कृती समितीत सहभागी असलेल्या पन्नासहून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरणे, यंत्रणा बंद पडणे, रुग्णांना वेळोवेळी सुविधा न पुरविणे, प्रसूतिगृहात चालणारा काळाबाजार, निधी मंजूर असूनही शासनाकडे पाठपुरावा न करणे आदी गंभीर मुद्दे उपस्थित करून समितीच्या सदस्यांनी सुधारणा न झाल्यास जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.
सीपीआर रुग्णालयावर शहरातील नव्हे तर जिल्ह्य़ातील रुग्ण औषधोपचारासाठी अवलंबून आहेत. मात्र सीपीआरचे निष्क्रिय प्रशासन व पोकळ घोषणा करणारे लोकप्रतिनिधी यामुळे सीपीआरचा गाढा रुतलेला आहे. रुग्णांना होणाऱ्या गरसोयीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सामाजिक कार्यकत्रे सीपीआर बचाव कृती समितीच्या झेंडय़ाखाली एकवटले आहेत. समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी अधिष्ठाता कोठुळे, जिल्हा शल्यचिकित्सक चौगुले यांची भेट घेतली. चच्रेवेळी सदस्यांनी रुग्णालयातील गंभीर समस्यांचा पाढा वाचला.
कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनी सीपीआर रुग्णालयातील समस्यांना अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक यांचा निष्क्रिय कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला. शासनाने निधी मंजूर केला असतानाही तो उपलब्ध करून घेण्यात उभयतांना अपयश आल्याचे त्यांनी नमूद केले. रुग्णालयात औषधांचा साठा असतानाही डॉक्टर तो रुग्णांना देत नाहीत असे बी. जे. मांगले यांनी सांगितले. रुग्णालयात शिल्लक असलेल्या औषधसाठय़ाची मागणी फलकावर लिहिण्याची मागणी प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई यांनी केली.
रुग्णालयाच्या प्रशासनाची मदार अधिष्ठाता कोठुळे यांच्यावर अवलंबून असताना गेल्या महिन्यात त्यांनीच निम्मे दिवस दांडी मारल्याचे बाबा कांबळे यांनी निदर्शनास आणून देऊन प्रशासनाने वेळेवर उपस्थित राहण्याची गरज व्यक्त केली. चच्रेवेळी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे स्थलांतरित करावे, औषधांचा भ्रष्टाचार रोखावा, वैद्यकीय उपकरणे त्वरित सुरू करावीत आदी मागण्या करण्यात आल्या. त्याचे निवदेन देऊन मागण्यांची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. प्रश्नांचा पाठपुरावा करणेसाठी १४ मे रोजी अधिष्ठातांची भेट घेतली जाणार आहे. तर १२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. चच्रेत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बबनराव राणगे, बाळासाहेब कांबळे,  प्राध्यापक शहाजी कांबळे, रूपा वायदंडे आदींनी भाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा