राज्यात मातामृत्यूचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मातामृत्यू होण्यास अनेक कारणे असली तरी निष्काळजीपणे मृत्यू झाल्यास उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
मातामृत्यू कमी व्हावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षभरात विदर्भात २०९ मातामृत्यू झालेत. हे मातामृत्यू होण्यास आरोग्य खाते कमी पडत आहेत काय? यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणार काय? असा प्रश्न नियम ९३ अन्वये जयवंतराव जाधव यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. सावंत म्हणाले, गेल्या वर्षांत विदर्भात २०८ मातामृत्यू झाले असले तरी ते आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे झालेले नाहीत. हे मृत्यू अडचणीची प्रसूती, शेवटच्या तीन महिन्यात अन्य आजार होणे आणि प्रसूतीनंतर खूप रक्तस्त्राव झाल्याने झाले आहेत. गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास माता मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली आहे.

Story img Loader