डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-या हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मंत्रतंत्राचा वापर केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. या संदर्भात ज्या पत्रकारांनी वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यांनी याबाबतचे पुरावे पोलिसांना देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. याबाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संदर्भात पाटील म्हणाले, मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्वच्छ व पारदर्शक काम केले असल्याने नेतृत्व बदल होण्याची शक्यता नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या तर पक्षाला उज्ज्वल यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वेचा अर्थसंकल्प स्वप्न विकणारा असून त्यातून प्रवाशांच्या हिताचे काहीही साध्य झालेले नाही अशी टीका करून ते म्हणाले, केवळ डबे वाढवल्यामुळे प्रवाशांचे प्रश्न सुटणार नाहीत. रेल्वेमध्ये विदेशी गुंतवणूक व्हावी यासाठी अर्थसंकल्पात सारा खटाटोप केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मागील अर्थसंकल्पात घेतला असल्याने त्याचे श्रेय सत्ताधा-यांना घेता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा