बोईसरमधील दोन पोलिसांवर कारवाई

बोईसर : पालघर जिल्ह्य़ातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक बनवले असून या पथकामार्फत अनेक ठिकाणी छापे टाकले जातात आणि कारवाई केली जाते. मात्र आता या पथकातील पोलीसच भ्रष्ट झाल्याचे उघड झाले असून अशा दोन खंडणीखोर पोलिसांवर खंडणीचा आरोप झाल्याने त्यांची तातडीने बदली करण्यात आली. या पोलिसांसोबत असलेल्या अन्य खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर येथील भंडारवाडा येथील दुकानदार मोहम्मद शेख या व्यापारावर तंबाखू व अवैध गुटखा ठेवल्याच्या आरोपावरून पालघर पोलीस अधीक्षकांच्या पथकातील दोन पोलिसांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासगी व्यक्तीने २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता छापा टाकून कारवाई केली. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा धाक दाखवून चार लाख १० हजार रुपयांची खंडणी उकळली असल्याची तक्रार मोहम्मद शेख याने केली. या फिर्यादीनंतर पैसे घेणारा पोलिसांचा सहकारी राजू दुबे याच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीमध्ये पोलिसांच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि साहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांची तातडीने दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली असून पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, खंडणीच्या आरोपानंतर पोलीस अधीक्षकांनी आपले विशेष पथक बरखास्त केले आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर यापुढेही कारवाई केली जाईल. याबाबत सर्व पोलीस स्थानकांना सूचना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी दिली.

बोईसरमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन पोलीस अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

बोईसर येथील खंडणीप्रकरणी राजू दुबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पोलिसांची बदली करण्यात आली असून विभागीय चौकशी करण्यात येईल. या गुन्ह्याचा तपास सुरू असून तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल.

– गौरव सिंग, पोलीस अधीक्षक, पालघर

Story img Loader