सातारा: पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर ‘हॉटेलमध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या बारा नृत्यांगना संगीताच्या तालावर उपस्थित वीस ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करत असताना पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकत वीस जणांना ताब्यात घेतले.
पाचगणीतील हॉटेल हिराबागमध्ये संगीताच्या तालावर नृत्यांगना अंगविक्षेप करत नृत्य करत होत्या. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई केली. घटनास्थळी वीस ग्राहकांसोबत बारा नृत्यांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वीस जणांमध्ये हॉटेलचे मालक आणि इतर सहभागी यांचा समावेश आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी संगीताची वाद्ये ध्वनियंत्रणा, माईक, मोबाइल फोन आणि एक मोटार जप्त केली आहे. पोलिसांनी एकूण २५ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. या सर्वांवर महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष कायदा, महिला प्रतिष्ठा संरक्षण अधिनियम तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.