लातूर : लातूर जिल्ह्यातील रोहिणा येथे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वतीने छापा टाकून गावात चालू असलेल्या अंमली पदार्थ कारखान्यातून सुमारे ११ किलो ३६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून काळ्या बाजारात त्याची किंमत १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या पथकाने दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावात जाऊन ही कारवाई केली आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून आश्चर्य म्हणजे अटक करण्यात आलेल्यात एका पोलिसाचा समावेश आहे. रोहिणा या गावातील प्रमोद केंद्रे हा ठाणे पोलीस हद्दीत पोलीस म्हणून कार्यरत आहे. त्याने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले पॅनल उभे केले होते व त्याच्या पॅनलने सपाटून मार खाल्ला.

या पॅनल साठी त्याला स्वतःची शेतजमीन विकावी लागली होती. मात्र, गावाकडे आल्यानंतर पराभव त्याच्या जिव्हारी लागलेला असल्यामुळे पुढच्या वेळी मी माझे पॅनल उभे करेन व ते निवडून आणेन असे तो मित्रांना सांगत असे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी अमली पदार्थाचा कारखानाच आपल्या गावात सुरू केला व त्यासाठी लागणारा कच्चा माल मुंबईहून तो गावाकडे पाठवत होता. छापा टाकल्यानंतर प्रमोद केंद्रे यांना पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर जुबेर हसन मापकर (रा. रोहा जिल्हा रायगड), अहमद मेमन, डोंगरी, मुंबई,मोहम्मद अस्लम खान मुंबई व मोहम्मद सलीम शेख मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुणे येथील अमली पदार्थ नियंत्रण शाखेतील अधिकारी वृंदा सिन्हा यांनी ही कारवाई केली. या पाच आरोपींना न्यायालयात उभे केले असताना त्यांनी पाचही जणांना अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सुपूर्द केले आहे.

\प्रमोद केंद्रेचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न

दोन दिवसापूर्वी रोहिणा येथे प्रमोद केंद्रे याला सोबत घेऊन कारखान्याची पाहणी करण्यात आली होती. त्याला चार चाकी वाहनातून लातूरकडे आणले जात असताना वाटेत रस्त्यात एका हॉटेलजवळ त्याने गाडीतून मागच्या सीट वरून चालकाचे ‘स्टेरिंग’ फिरवले. त्यामुळे गाडी दुचाकीला जाऊन धडकली. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयासमोर हजर केले.