सातारा : साताऱ्यातील शिरवळ (ता. खंडाळा)येथे सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी येथे ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा तसेच गुटखा बनविण्याच्या यंत्रसामग्रीसह तब्बल १ कोटी ६ लाख १९ हजार रुपयांचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोन गाळा मालकांसह आठ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
शिरवळ येथे गुटख्याचे उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर शिरवळ पोलीस व अन्न व औषध विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी अवैध आरएमडी गुटखा, गुटखा साहित्य व गुटखा बनविण्याच्या मशीनसहित १ कोटी ६ लाख १९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिरवळ पोलिसांनी कोट्यवधींच्या गुटख्याचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर याप्रकरणी विक्रेता सुनील पुतीन सिंह, राहुल हरिलाल देपन, कन्हैयालाल काळुराम गेहलोत, पुष्पेंद्र अकबाल सिंह (चौघे रा. नऱ्हे, पुणे), कामठे (पूर्ण नाव माहीत नाही रा.पुणे), दोन गाळे मालक, स्वप्नील नामदेव देवकर (रा. चौरे मळा, वडगाव आनंद, ता. जुन्नर जि. पुणे) यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती नलावडे यांनी दिली.