अहिल्यानगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आधार केंद्र व सेतू केंद्रांची (आपले सरकार सेवा केंद्र) तपासणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत आत्तापर्यंत एकूण ३० सेतू केंद्रांवर विविध कारणांनी कारवाई करुन ते बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकूण २०६ आधार केंद्र आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, बीएसएनएल यांच्या मार्फत त्यांना कीट देण्यात आले आहेत तर सेतू केंद्रांची संख्या २१०६ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह ग्रामपंचायत, महाविद्यालयामार्फत त्यावर नियंत्रण ठेवले जाते. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आधार केंद्र व सेतू केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात ३० सेतू केंद्रांवर विविध कारणांनी कारवाई करत गैरप्रकार आढळल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आधार केंद्राना १०२ किट वितरित करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष त्यातील ८४ सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ६९, शिक्षण विभागामार्फत २८, बीएसएनएल मार्फत १० केंद्र कार्यान्वित आहेत. याशिवाय आणखी नवे ७७ केंद्र जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सेतू केंद्र ग्रामपंचायतमार्फत १२४२, खाजगी व्यक्तींमार्फत ८४१ तर महाविद्यालयांमार्फत १३ केंद्र चालवले जात आहेत. अहिल्यानगर, नेवासा व श्रीरामपूर येथील ३० केंद्र बंद करण्यात आले आहेत. दर फलक न लावणे, एका जागेवर मंजूर असलेले केंद्र दुसरीकडे चालवणे, अवास्तव शुल्क आकारणे, आदी करणांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्यासह १३ जणांनी बांगलादेशी घुसखोरांना (रोहिंगे) कागदोपत्री आश्रय देणाऱ्या आधार केंद्र चालकांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिका, तहसीलदार, उपविभागीय कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देत जिल्ह्यातील सर्व केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशी घुसखोरांना (रोहिंगे) सेतू चालकंमार्फत आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना अशी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने काढून देण्यात येत असल्याची तक्रार असल्याने, या अनुषंगाने तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीत गैरप्रकार करणारे आधार केंद्र चालक आढळून आल्यास संबंधितांचे केंद्र बंद करण्याची कारवाई प्रस्तावित करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.