Majhi Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेच्या बळावर महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मात्र जसजसे महिने उलटत आहेत, तसे या योजनेतील काही तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. सरकारकडूनही युद्ध पातळीवर या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर बँक त्यातून शुल्क कपात करत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली होती. यानंतर आता सरकारने याबाबत कठोर पावले उचलली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
मंगळवारी (दि. १ ऑक्टोबर) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.
भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार
लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शूल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दि. २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तिसऱ्या हप्त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाल्या?
आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.