शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेलं वक्तव्य आता त्यांना भोवणार असल्याचं दिसत आहे. कारण, सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अंधारे यांच्या तक्रारीवर ४८ तासांच्या आत कारवाई करून महिला आयोगाला अहवाल सादर करा अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
“हे माझे भाऊ आहेत. ते माझे भाऊ आहेत. असं म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती”, असं वादग्रस्त व्यक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. “आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत घालवली. तू आहेस कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती.
हे ही वाचा >> “उंटावरून शेळ्या हाकणारे”, राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
दरम्यान, याप्रकरणी काय कारवाई झाली असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना केला. त्यावर चाकणकर म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना यासबंधी चौकशी करून कारवाई करण्याची आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. हा अहवाल ४८ तासांमध्ये सादर करण्यास सांगतले होते. उद्या तो कालावधी संपेल. तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे.