वाई: खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा कायम राहिल्याने साताऱ्यात उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपाची राज्याची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली. मात्र या यादीतही नाव नसल्याने भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात येऊनही कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत. भाजपकडूनही उदयनराजेंचे नाव चर्चेत नसल्याने व पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीकडे बोट करत कोणतीही हालचाल करताना दिसत नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले. उमेदवारी जाहीर न करणे हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे असे सांगत खासदार उदयनराजेंचे नाराज समर्थक साताऱ्यात आक्रमक झाले. त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनाच घेराव घालत, जाब विचारत, धारेवर धरले.
भाजपाची लोकसभेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही. खासदार उदयनराजे इच्छुक आहेत. तशी तयारीही ते वर्षभरापासून करत आहेत. कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र उदयनराजेंचे नाव जाहीर होत नसल्याने उमेदवारी जाहीर न करणे हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे, असे सांगत कार्यकर्ते संतप्त झाले. बुधवारी रात्री भाजपध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक साताऱ्यात येऊन भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली. मात्र उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत.
हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली
यावेळी ‘मान छत्रपतींच्या गादीला आणि मतही गादीला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त करत जिल्हाध्यक्षांनी नेमकी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली. त्यावर लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी सर्वांना शांत करत खासदार उदयनराजेंशी चर्चा करून भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष भूमिका मांडतील, असे सांगितल्याने कार्यकर्ते शांत झाले.
यावेळी आयोजित बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सर्वांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. उदयनराजेंबाबत केंद्रीय नेतृत्वाकडे कोणी चुकीची माहिती पोहोचवली. त्याचे नाव जाहीर करा, अशी भूमिका घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या. यामध्ये प्रवीण धस्के, संतोष जाधव, पंकज चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, श्रीकांत आंबेकर आदींनी आपल्या भूमिका मांडल्या. सुनील काटकर यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा हतबल न होण्याचा सल्ला देत सर्वांना शांत केले. कोणीही उदयनराजे यांच्या विचाराला गालबोट लावू नये. भाजपच्या महिला मेळाव्यातही उदयनराजेंच्या उमेदवारीची मागणी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा
उमेदवारी जाहीर होण्याची काही प्रक्रिया पार पाडावी लागते. यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. असे सांगितल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले
यावेळी प्रवीण धस्के, शरद काटकर, पंकज चव्हाण, सौरभ सुपेकर, संग्राम बर्गे, संतोष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.