आपल्याकडे परिस्थितीच अशी आहे, की आपल्याकडच्या कलाकारांना दोन व्यवसाय करणे भाग पडते एक उपजीविकेसाठी आणि दुसरा आपल्या आनंदासाठी! दुसऱ्या व्यवसायातून त्याला जगण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते. त्यामुळे त्याची वास्तवाशी नाळ जोडलेली राहते, असे स्वानुभवाचे बोल ९३ व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या उत्स्फूर्त अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
गेल्या ९२ नाटय़संमेलनांतील लिखित स्वरूपातील अध्यक्षीय भाषणाचा रिवाज बाजूला ठेवत डॉ. मोहन आगाशे यांनी, लेख हा लिहायचा असतो आणि भाषण हे करायचे असते असे सांगत श्रोत्यांशी संवाद साधला. त्यांच्या या उत्स्फूर्त अध्यक्षीय भाषणाला मिश्कीलपणाची झालर होती. संमेलनाचे उद्घाटक शरद पवार आणि स्वागताध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पाहत ‘काका-पुतण्या हे देखील उत्तम अभिनेते असल्याचे मला कळून आले आहे,’ या त्यांच्या टिपणीला टाळ्यांची दाद मिळाली.
शाळा सकाळी नऊला भरते आणि एकला सुटते. शेवटच्या तासाला विद्यार्थ्यांची चुळबूळ सुरू असते. म्हणून अध्यक्षीय भाषण शेवटी ठेवण्याची प्रथा असावी. निवडणूक न होता देखील ‘निवड’णुकीने माझी अध्यक्षपदी निवड झाली याचा आनंद झाल्याची भावना डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. आपण या वर्गाचा मॉनिटर नेमतो पण गॅदरिंगचा पाहुणा निमंत्रित करतो. त्यामुळे निवडणूक कधी घ्यावी आणि आमंत्रित कधी करावे, याचे तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाटय़ परिषदेच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले.
आपल्याकडे डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनिअर यांच्या संघटना आहेत. अगदी शेतक ऱ्यांची देखील शेतकरी संघटना आहे. विघटन करणारे हे व्यवसाय एका बाजूला, तर समाजाला एकत्रित करणाऱ्या संगीत, नाटक, चित्र आणि शिल्प या कला दुसऱ्या बाजूला! शालेय शिक्षणात ज्या गोष्टींचा चांगला उपयोग होऊ शकतो, त्यांचा समावेश एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये केला जातो. केवळ अभ्यासच केला असता, तर मी आज येथे अध्यक्ष म्हणून भाषण करू शकलो नसतो, असेही डॉ. आगाशे यांनी सांगितले. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘जैत रे जैत’ मधील अभिनयामुळे मंत्रालयात सहज प्रवेश मिळून होणारी कामे आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मानसिक आरोग्य क्षेत्रात करावे लागलेले काम या दोन्ही गोष्टी परस्परपूरक ठरल्या असे ते म्हणाले. रंगभूमी एकच आहे. हौशी आणि व्यावसायिक असे आपण रंगभूमीचे कप्पे आहेत. तर बालरंगभूमी, दलित रंगभूमी आणि कामगार रंगभूमी हे तिचे विभाग आहेत. आपल्याकडे प्रत्येकाला जगण्यासाठीचा एक आणि जगण्याला अर्थ देण्यासाठी एक असे दोन व्यवसाय असतात. पूर्वी मानसिक आरोग्योपचाराचे काम हा माझा व्यवसाय होता आणि चित्रपट-नाटकातील अभिनय ही हौस होती. आता अभिनय हा माझा व्यवसाय झाला आहे. आयुष्यामध्ये एक टप्प्यावर प्रत्येक गोष्टींचा विचार पैशांपेक्षा वेळेच्या संदर्भात झाला पाहिजे. त्यामुळे पैशांपेक्षाही आपण वेळेची गुंतवणूक कशी करतो याला महत्त्व आहे, असे सांगून डॉ. मोहन आगाशे पुढे म्हणाले, लहान वयापासूनच मुलांना उत्तम नाटके पाहण्याची सवय लागली पाहिजे, तरच प्रेक्षक म्हणून आपली आणि पर्यायाने रंगभूमीची कक्षा विस्तारेल.    
अभिनयाची दीक्षा पवारांकडून!
अभिनयाची दीक्षा मला शरद पवार यांच्याकडूनच मिळाली. एकाच वेळी ते सत्तेमध्ये असतात आणि विरोध पक्षनेते देखील असतात. ते विरोधी पक्षनेते होते. तेव्हासुद्धा त्यांचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी चांगले जमायचे, हे मी मंत्रालयामध्ये अनेकदा पाहिले आहे. असा अभिनयाचा खेळ काका-पुतण्या यांच्यामध्ये देखील सुरू असतो, अशी टिपणी डॉ. मोहन आगाशे यांनी करताच शरद पवार यांच्यासह सर्वानी त्यांना दिलखुलास दाद दिली.

Story img Loader