ज्या रसिक प्रेक्षकांच्या जिवावर आपण मोठे झालो, त्यांना विसरून केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागून नाटय़संमेलनास अनुपस्थित राहणे योग्य नाही, हे सगळ्या कलावंतांनी ध्यानात घ्यावे. अशा कलावंतांच्या बाबतीत नाटय़ परिषदेने कारवाई करण्याबाबतचे धोरण ठरवावे, अशा सणसणीत कानपिचक्या येथे भरलेल्या ९३ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात दिल्या. त्याचबरोबर, अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या भोंगळ कारभाराबद्दलही त्यांनी जाहीरपणे खडे बोल सुनावले.
रत्नागिरीच्या नाटय़संमेलनात पाच कोटी रुपयांचे शासकीय अनुदान आपण जाहीर करूनही नाटय़ परिषदेने त्याच्या विनियोगासंबंधीचा आराखडा शासनास अद्यापि सादर केलेला नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर नाटय़गृहांच्या तारखावाटपात नाटय़निर्माते जे राजकारण करतात त्यास वेळीच पायबंद न घातल्यास त्यासंदर्भातही कारवाई करण्याचे सूतोवाच स्वागताध्यक्ष अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भव्य प्रांगणात आज ९३ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे शानदार उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तर स्वागताध्यक्ष होते उपमुख्यमंत्री अजित पवार. उगवते संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, मावळते संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, बारामतीच्या नगराध्यक्षा जयश्री सातव, खासदार सुप्रिया सुळे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, उपाध्यक्ष विनय आपटे, प्रमुख कार्यवाह स्मिता तळवलकर, कोषाध्यक्ष वंदना गुप्ते, संमेलनाचे संयोजक किरण गुजर प्रभृती या वेळी व्यासपीठावर विराजमान होते.
स्वागताध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या भाषणात नाटय़व्यवसायातील अनेक दुखण्यांवर मार्मिकपणे बोट ठेवले. नाटकांनी किती दिवस अनुदानावर अवलंबून राहायचे, असा सवालही त्यांनी विचारला. जोवर गावागावातील सामान्य लोकांपर्यंत नाटक पोहोचत नाही, तोवर स्वबळावर नाटक उभे राहू शकणार नाही. बॅकस्टेज आर्टिस्टच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नाटय़संमेलनाचे उद्घाटक आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या काहीशा दीर्घ भाषणात आजच्या नाटय़-साहित्य- संस्कृती व्यवहारावर गंभीर भाष्य केले. मुंबईच्या ‘शेरीफ’ पदासारखे नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद शोभेचे झाल्याबद्दल खंत व्यक्त करून ते म्हणाले की, नाटय़ तसेच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील योगदानाचा एक प्रकारे सन्मान असतो. त्यामुळे त्या पदासाठी निवडणूक होणे चुकीचे आहे. त्यांची सन्मानाने आणि एकमतानेच निवड व्हायला हवी. नाहीतर आम्ही या क्षेत्रांचा ताबा घेऊ. मग निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आमच्या जवळपासही तुम्ही फिरकू शकणार नाही, असे ते गमतीने म्हणाले.
‘‘आज गावोगावी कलाकार घडत आहेत. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूरसारख्या ठिकाणी विद्यापीठांतून नाटय़शास्त्र शिकून बाहेर पडणारे हे कलावंत आपल्या प्रतिभेवर नावारूपास येत आहेत. परंतु ते ज्या विद्यापीठांतून शिकताहेत तिथल्या नाटय़शास्त्र विभागांना विनाअनुदान तत्त्वावर शासनाने परवानगी दिलेली आहे. खरे तर राज्य सरकारने त्यांना घसघशीत मदत करायला हवी, ती आपली जबाबदारीच आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘रंगभूमीवर कर्तृत्व गाजविणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांच्या त्यांच्या हयातीतच ध्वनिचित्रफिती काढून ठेवायला हव्यात; जेणे करून नव्या पिढीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होऊन त्यांना त्यातून प्रेरणा मिळेल, असे सांगून पवार यांनी याकामी नाटय़ परिषदेने पुढाकार घ्यावा,’’ अशी सूचना केली.
रंगभूमीच्या निरनिराळ्या प्रवाहात आणि त्यांची मातृसंस्था म्हणविणाऱ्या नाटय़ परिषदेत अंतर निर्माण झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि सर्वानी एकजुटीने काम करावे, असे सुचविले. विनोदी नाटकांबरोबरच गंभीर नाटकेही सादर व्हायला हवीत; ज्यामुळे प्रेक्षकांच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावतील, असे ते म्हणाले. त्याचबरोबर, कलाकारांनी आपले अवकाश अधिक विस्तीर्ण करायला हवे. त्यांनी अल्पसंतुष्ट राहणे योग्य नाही. त्यासाठी त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचाही अंगीकार करावा, अशी सूचना शरद पवार यांनी केली.
‘‘आजची पिढी संगणक सोशल नेटवर्किंग मीडियाच्या भ्रामक जगात गुंगून गेली आहे. तिचा वास्तवाशी संबंध तुटला आहे. ही पिढी आणि नाटक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. या पिढीला नाटकाकडे, जीवनातील वास्तवाकडे आणण्यासाठी काय करता येईल, याचा गांभीर्याने या संमेलनात विचार व्हायला हवा,’’ असे मत संमेलनाच्या उद्घाटनपर सत्राचे अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे,‘‘ग्रामीण भागातील लोककला आणि लोककलावंत यांच्याकडून रंगभूमीने खूप काही घेतले, पण त्या बदल्यात त्यांना आपण काय दिले, याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा,’’ असेही म्हणाले. वैश्विक पातळीवर दखल घेतली जाईल अशी नाटय़कृती आपल्याकडे निर्माण व्हावी, शासन त्याकामी सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजितदादा पवार यांनी सांगलीहून बारामतीला आलेल्या नाटय़ज्योतीने संमेलनस्थळीची मशाल प्रज्वलित करून संमेलनाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ केला. नाटय़ परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्मिता तळवलकर यांनी प्रास्ताविक केले, तर परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या १२.१२.१२ या दुर्मिळ योगायोगात आलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत बारामतीस भरलेल्या या संमेलनाचे आगळे महत्त्व विशद केले. या वेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचेही भाषण झाले. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी नवे संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांना संमेलनाध्यक्षांचे पदक आणि पगडी प्रदान करून त्यांच्या हाती सूत्रे सुपूर्द केली. श्रीकांत मोघे यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उद्घाटक शरद पवार यांच्या हस्ते झाले. नाटय़ परिषदेचे उपाध्यक्ष विनय आपटे यांनी आभार प्रदर्शन केले.
कलाकार व नाटय़ परिषदेला अजितदादांच्या कानपिचक्या!
ज्या रसिक प्रेक्षकांच्या जिवावर आपण मोठे झालो, त्यांना विसरून केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागून नाटय़संमेलनास अनुपस्थित राहणे योग्य नाही, हे सगळ्या कलावंतांनी ध्यानात घ्यावे. अशा कलावंतांच्या बाबतीत नाटय़ परिषदेने कारवाई करण्याबाबतचे धोरण ठरवावे,
First published on: 23-12-2012 at 03:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor not to forget audiance ajit pawar