शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा शुक्रवारी (२९ डिसेंबर) सांगलीत पार पडला. यावेळी दिग्गज नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केलेल्या भाषणात राज्यातल्या पाच नेत्यांवर स्तुतीसुमनं उधळली. व्यासपीठावर सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित असताना दामले यांनी राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची नावं घेतली. मुनगंटीवार यांच्यासह या कार्यक्रमावेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली की, नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अत्याधुनिक ७५ नाट्यगृहं उभारली जातील. तसेच या नाट्यगृहातील विद्युत व्यवस्था सौरउर्जेवर करण्यात येणार आहे. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, “नाटक हा उत्कृष्ट कलाप्रकार असून देशात बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये हा कलाप्रकार अधिक चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा कलाप्रकार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावा यासाठी चिंतन, मनन होण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक युगात नाट्यकला वृद्धींगत होण्यासाठी रसिक, कलावंत आणि नाटककार या तीन गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी शासन मदत करण्यास सदैव तत्पर आहे.
या कार्यक्रमावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनीदेखील भाषण केलं. दामले म्हणाले, मी गेली ४० वर्षे मंचावर पाठ केलेले संवाद बोलतोय. परंतु, पहिल्यांदाच उत्स्फूर्तपणे बोलण्यासाठी उभा आहे. आम्ही कलावंत खूप भाग्यवान आहोत, कारण आमच्या पाठीशी पाच मोठी माणसं उभी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार, ही माणसं आमच्या पाठीशी आहेत.
हे ही वाचा >> “मराठी माणसाचा दिल्ली दरबारात अपमान”, देवेंद्र फडणवीसांवरील अन्यायांची यादी वाचत सुप्रिया सुळेंचा संताप
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आज आपण सोशलकडून सेल्फिश होऊ लागलो आहोत. भावनांचा निचरा करण्यासाठी कला म्हणून नाटकाकडे पाहिले पाहिजे. नाटकाला रसिकांचा आश्रय मिळावा यासाठी ७५ नवीन नाट्यगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सर्व नाट्यगृहे वातानुकूलित असतील आणि यासाठी सौरउर्जेचा वापर केला जाईल. यामुळे नाट्यगृहाची भाडे आकारणी मर्यादित होऊन रसिकांनाही कमी दरात चांगली नाटके पाहता येतील”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यावेळी पालकमंत्री खाडे यांनी नाट्य संमेलनाच्या मुहर्तमेढ सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी नियोजन मंडळाच्या निधीतून १० लाखांचा निधी दिला जाईल असे सांगितले.