गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आले होते. एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातूनही टीका-टिप्पणी केली जात होती. यावर मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी या विधानामागची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असंही त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.
काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचं. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही”, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता.
दरम्यान, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले या दाव्यावरून वाद निर्माण झाला. अखेर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विधानामागची नेमकी भूमिका मांडतानाच ‘लाच’ या शब्दासाठी दिलगिरीही व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणत त्यांनी स्पष्टीकरणाचा एक व्हिडीओ जारी केला आहे.
“साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवर मी ५० मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहासातल्या काही रंजक गोष्टी कशा बनतात, यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी या वाचायला-अभ्यासायला मिळाल्या होत्या. त्यातल्या काही गोष्टींवर मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कुणाला रत्न दिली, कुणाला पैसे दिले असं काय काय केलं, या सगळ्याचं एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कसं आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि तिथून स्वत:ची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला”, असं राहुल सोलापूरकर म्हणाले.
“कुणीतरी दोन वाक्य काढून त्यावर गदारोळ केला”
दरम्यान, लाच शब्द वापरल्याबद्दल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले यावर मी वेगळं काही संगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून. जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्यानं मी दिली आहेत. जगभरातल्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे”, असं राहुल सोलापूरकर स्पष्टीकरणाच्या व्हिडीओत म्हणाले आहेत.
“माझं यावर सांगणं आहे की यात महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही. इतिहास रंजक कसा केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यातील लाच या शब्दामुळे जर शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपतींचं गुणगाण करतच मोठा झालो आहे. गड-किल्ल्यांवर मी वाढलो आहे. मी रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच केली होती. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे. यावरून उगाच महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही सांगत असाल तर मी यापुढे शिवाजी या विषयावर काही बोलणारही नाही. माझं म्हणणं आहे की एखाद्या शब्दावरून कीस पाडायचा आणि एका व्यक्तिमत्वाला लक्ष्य करायचं असं होऊ नये. लाच हा शब्द शिवाजी महाराजांसाठी अजिबात नव्हता”, असं राहुल सोलापूरकर म्हणाले.