अलिबाग : अभिनेता रणवीर सिंह याने नुकतीच अलिबाग तालुक्यातील सातिर्जे गावाला भेट दिली. या भेटी दरम्यान गावात काही मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे तो गाडीतून खाली उतरत मुलांमध्ये सहभागी झाला. क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. रणवीरच्या अनपेक्षित कृतीमुळे गावातील मुलेही चांगलीच अचंबित झाली.

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दिपिका पादूकोण यांनी गेल्या वर्षी अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचात हद्दीत फार्म हाऊस खरेदी केले आहे. ९९ गुंठे बिनशेती जागेत त्यांनी आलिशान घरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे दोघांचेही वरचेवर अलिबागला येणे होत असते. सुट्टीच्या काळात दोघेही अलिबागला वास्तव्यास असतात. शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी रणवीर सिंह नुकताच अलिबागला आला होता. त्यांने सातिर्जे गावातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर उपस्थित होते. परतीच्या प्रवासा दरम्यान गावातील मुले क्रिकेट खेळत असल्याचे रणवीरला दिसले. त्यामुळे त्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. तो खाली उतरून थेट मुलांकडे गेला. मी पण खेळणार म्हणत त्यांच्यात सहभागी झाला. उत्तम फलंदाजी करत त्याने सगळ्यांनाच अचंबित केले. फटकेबाजी करून मुलांची मनेही जिंकली. अभिनयासोबत आपण चांगली फलंदाजीही करू शकतो हे त्याने मुलांना दाखवून दिले. नंतर मुलांसोबत सेल्फीही काढले आणि पुढच्या प्रवासाला रवाना झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारीत चित्रपटात रणवीर नुकताच कपिल देव यांच्या भुमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनय करतांना त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी करत हुबेहूब कपिल देव यांची छबी साकारली होती. पण प्रत्यक्षातही तो उत्तम क्रिकेट खेळू शकतो याचा अंदाज कोणालाच नव्हता. पण सातिर्जे गावात फटकेबाजी करत त्याने आपले कसब दाखवून दिले. रणवीर क्रिकेट खेळून निघून गेला मुले मात्र त्याच्या बिनधास्त वागण्यामुळे अचंबित होऊन बघत राहीली.