Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (११ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.
हेही वाचा : माणिकराव कोकाटेंची अजित पवारांना मोठी ऑफर; म्हणाले, “सिन्नरमधून…”…
अभिनेते सयाजी शिंदे यांनी हिंदी, मराठी तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभे केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी श्री. सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल… pic.twitter.com/oXWmCLDMsl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 11, 2024
या पक्ष प्रवेशावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं. भुजबळ म्हणाले, “आता उद्या दसरा आहे. पण आम्हाला आजच दसरा साजरा करण्याचं भाग्य लाभलं. खरं तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. ते अभिनेते आहेतच, पण आता ते नेते देखील झाले आहेत. सयाजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे”, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं.