Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (११ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी हिंदी, मराठी तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभं केलं. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र, सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश का केला? याबाबत सयाजी शिंदे यांनी भाष्य केलं आहे. “मला या पक्षाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) काही स्ट्रॅटेजी आणि विचार आवडले, म्हणून प्रवेश केला”, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सयाजी शिंदे काय म्हणाले?

“मी अजून नेता झालेलो नाही. त्यामुळे मला अजून एवढं बोलता येत नाही. मी चित्रपटात नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या भूमिका केलेल्या आहेत. खलनायकाच्याही भूमिका केल्या. मी राजकारणात कधी येईल, असं मला वाटलंच नव्हतं. गेल्या १० वर्षांपासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. या कामाची सुरुवात माझ्या आईमुळे झाली होती. मी ठरवलं होतं की, माझ्या आईच्या वजनाएवढ्या झाडाच्या बिया लावेन आणि पर्यावरणाचं चांगलं काम करेन. हे काम करत असताना काही अडचणी आल्या की मंत्रालयात जावं लागायचं. समजा मी जर २५ वेळा मंत्रालयात गेलो असेल तर त्यापैकी १५ वेळा अजित पवारांना भेटलो. ज्या-ज्या वेळी मी अजित पवारांना भेटलो तेव्हा एक घाव दोन तुकड्यासारखं काम त्यांनी केलं. ते लगेच तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मला देखील खूप फायदा झाला. त्यांना भेटल्यामुळे पटकन कामे झाली. त्यामुळे मला त्यांच्याबाबत कायम आदर आहे”, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Sayaji Shinde : मोठी बातमी! अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

“मागील ८ दिवसांत अचानक ठरलं की राजकारणात गेलं तर काय होईल? मग मला वाटलं की बाहेर राहून बरेच प्रश्न बोलण्यापेक्षा सिस्टममध्ये जाऊन बोललं पाहिजे. प्रश्न सोडवले पाहिजेत. मग जर अजित पवारांसारखा माणूस असेल तर काय? राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर काय? मग मला वाटलं की का नाही? मग माझ्या डोक्यात उत्तर आलं, हो”, असं सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश केला?

“महाराष्ट्रात ४० ठिकाणी आपल्या ‘सह्याद्री देवराई’ उभ्या राहत आहेत. सर्वच गोष्टी आज तुमच्याशी बोलत नाही. पण मला असं वाटतं की, मला या पक्षाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) काही स्ट्रॅटेजी आणि विचार आवडले आहेत. शेतकऱ्यांच्या योजनाबाबत अजित पवारांबरोबर जेव्हा-जेव्हा आमची चर्चा झाली. तेव्हा असं वाटलं की हे चांगले निर्णय घेत आहेत. यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो निर्णय आहे. तो चांगला आहे”, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sayaji shindes join ncp ajit pawar group why forced into politics sayaji shinde told the reason gkt