‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता योगेश शिरसाट याने शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सिनेसृष्टीतील समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं योगेश याने यावेळी सांगितलं. योगेशने झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला. या कार्यक्रमातील त्याच्या वेगवेगळ्या विनोदी भूमिकांनी त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडलं.
योगेश शिरसाट याच्यासोबत अभिनेते राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेना प्रवेशावेळी योगेश शिरसाट यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, “आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, बरेच कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या माध्यमातून तो आवाज पोहोचावा यासाठी आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.”
योगेश म्हणाला की, “कलावंतांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्वजण अभिनेते सुशांत शेलार यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आणि शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला. सिनेसृष्टीत धडपड करणाऱ्या कलावंतांच्या राहण्याचा प्रश्न आहे, तसेच इतर काही प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. त्यावर काही उपाय काढण्याची विनंती करणार आहोत.”
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंचं पक्षचिन्ह आणि नाव काढून घेतलं असलं तरी…”, सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया
सिनेसृष्टीतील सर्व घटकांसाठी काम करणार : सुशांत शेलार
कलाकारांच्या शिवसेना प्रवेशावेळी अभिनेते सुशांत शेलार म्हणाले की, “सिनेसृष्टीतील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, मेकअप करणारे कलाकार. डान्सर्स तसेच या चित्रपट क्षेत्रातल्या सर्व घटकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता या सर्व कलाकारांना एकत्र करून कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं जाईल.”