नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यापासून ते मनस्वी दु:ख झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली. दादांचे चारित्र्य, चांगुलपणा, प्रामाणिकपणाचा शिंदे यांनी उपमर्द केला आहे. कलाकारांचे नेते असलेल्या दादांचा अपमान म्हणजे कलाकारांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दादांच्या प्रत्येक चित्रपटात कलाभिनय घडविणारे भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
पंढरपूर येथे झालेल्या सभेत सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या प्रयत्नात मोदींना दादा कोंडके यांची उपमा दिली आहे. दादांपेक्षाही मोदी थापाडे आहेत असे विधान त्यांनी केले आहे. दादा कोंडके यांना थापाडे ठरवण्याच्या शिंदे यांच्या वक्तव्याने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. एकेकाळी राज्याचे सांस्कृतिक खाते हाताळलेल्या एका नामवंत कलाकाराचा उपमर्द केल्याची भावना कलाकार, तंत्रज्ञांमध्ये निर्माण झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविणा-या दादांच्या चित्रमय कर्तृत्वाला बाधा आणल्याची प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या करवीरनगरीत उमटली आहे.
‘वारसा दादा कोंडके’ यांचा या पहिल्या मराठी टीव्ही टॅलेंट शोचे विजेते नितीन कुलकर्णी यांनी शिंदेंसारख्या जाणकारांनी दादांच्या बाबतीत चुकीचे विधान करायला नको होते. यामुळे समस्त कलाकारांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली. नरेंद्र मोदी, दादा कोंडके या भिन्न क्षेत्रातील उच्चतम दर्जाच्या व्यक्ती असताना त्यांची तुलना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. क्षणिक प्रसिद्धिलोलुपतेसाठी कोपरखळी मारली तरी कोपरातून आलेले ढोपर पोटात खुपते याचा विसर पडता कामा नये असा कोल्हापुरी टोला त्यांनी लगावला आहे. दादांच्या ‘थापाडय़ा’ चित्रपटाचा उल्लेख आता झाला असला तरी उद्या त्यांच्या चित्रपट नामावलीप्रमाणे आली अंगावर, बोट लावीन तिथं गुदगुल्या असा शब्दप्रयोगही शिंदे करतील का याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दादांचे खरेखुरे वारसदार असलेले त्यांचे पुतणे व चित्रपट निर्माते विजय कोंडके यांनी मात्र या विधानाबाबत बचावात्मक पवित्रा घेतला आहे. दादा घरचे असले तरी आपण चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असल्याने सर्वपक्षीयांची मदत लागत असल्याने या विधानावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दादांसमवेत एकूण एक चित्रपटांत काम केलेले भालचंद्र कुलकर्णी यांनी शिंदे यांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे म्हटले आहे. चित्रपटसृष्टीविषयी शिंदे यांचे मत चांगले असतानाही त्यांनी असे विधान करायला नको होते. दादांनी कधीही थाप मारली नाही. व्यवहाराने चोख असलेल्या दादांच्या वागण्यात खोटारडेपणा नव्हता. मोदींविषयी शिंदेंना जी टीका करायची ती ते करू शकतात. पण दादांसारख्या प्रामाणिक व्यक्तीला त्यामध्ये गोवून तशी उपमा देणे हा बालिशपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद अष्टेकर यांनी कलाकार हा कोणाच्या अध्यातमध्यात नसताना राजकारणासाठी त्याला गोवणे चुकीचे असल्याचे नमूद करून विधानाचा वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदविला. दादांसारख्या अष्टपलू कलाकाराचा वापर टीकेसाठी करणे योग्य नसल्याचे मत महामंडळाचे सचिव सुभाष भुर्के यांनी व्यक्त केले आहे.
सुशीलकुमारांच्या दादा कोंडकेंवरील वक्तव्यावर कलाकारांमधून पडसाद
नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यापासून ते मनस्वी दु:ख झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली. दादांचे चारित्र्य, चांगुलपणा, प्रामाणिकपणाचा शिंदे यांनी उपमर्द केला आहे.
First published on: 15-04-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actors criticized to sushilkumar shinde