देशभरात भोंग्यांचा मुद्दाच कमालीचा गाजत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील भोंग्याबाबत निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात भाजपाकडून आणि मनसेकडून या निर्णयाचं जोरदार कौतुक झालं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर योगींचं कौतुक करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘भोगी’ म्हणत टीकास्त्र सोडलं. या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना भोगी म्हणत योगींकडून शिकण्याचा टोला लगावला. याला आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का?” दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर आता फडणवीस आणि सय्यद यांच्यात शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला टोला
राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया…
सुप्रिया सुळेंना अमृता यांच्या याच टिकेसंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन थेट मुख्यमंत्र्यांना इशारा केलाय. “ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से,” असं अमृता म्हणाल्या असल्याचं पत्रकारांनी सुप्रिया यांना सांगितलं अन् यावर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणावर बोलताना सुप्रिया यांनी, “मी तुम्हाला खरं सांगू मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी मगाशी सांगितलं तसं मला इतकी कामं असतात की मला नाही माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला फारसा वेळ मिळतं,” असं उत्तर दिलं.
उत्तर प्रदेशात नेमकं घडलंय काय?
उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय.
हेही वाचा : “कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कोणी…”; आव्हाडांचा तो टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना?
“राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आलीय,” असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.