एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. समीर वानखेडेंची भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात एकीकडे चौकशी चालू असताना दुसरीकडे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनं सातत्याने समीर वानखेडेंच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात शुक्रवारी रात्री मीडियाशी बोलताना क्रांती रेडकरनं आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाली क्रांती रेडकर?
हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन क्रांती रेडकर शुक्रवारी संध्याकाळी माध्यमांसमोर आली. “महाराजांच्या प्रतिमेपेक्षा अजून मोठं ऊर्जास्थान काहीही नाही. प्रत्येक मराठी माणसासाठी हेच ऊर्जास्थान असतं. महाराजांची प्रतिमा जेव्हा तुम्ही हातात घेता, तेव्हा १०० हत्तींचं बळ तुम्हाला मिळतं. समीर वानखेडे देशसेवा करत आहेत. त्यात माझा हा खारीचा वाटा आहे. मी नक्कीच त्यांच्या पाठिशी आयुष्यभर असेन, मरेपर्यंत लढेन”, असा निर्धार क्रांती रेडकरनं व्यक्त केला.
“जेव्हा मनोबल तुटत असतं, तेव्हा समोरून येऊन तुम्ही पाठिंबा दिला, तर त्या माणसाला लढा देण्याची शक्ती मिळते. सावकाश आणि शाश्वतपणे आम्ही ही शर्यत जिंकू”, असंही क्रांती रेडकर म्हणाली.
“इतिहासात लिहिण्यासारखी ही लढाई”
दरम्यान, समीर वानखेडेंच्या चौकशीसंदर्भात बोलताना क्रांतीनं हा ऐतिहासिक लढा असल्याचं नमूद केलं. “ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी आहे. त्यात जर माझं नाव अगदी बारीक अक्षरात जरी आलं, तरी मी स्वत:ला अभिमानी समजेन. दु:ख हेच आहे की पुन्हा पुन्हा तेच होतंय. काहीतरी वेगळं असतं तर गोष्ट वेगळी असती. लढायलाही हुरूप येत असतो. पुन्हा पुन्हा तेच होतं त्याचं दु:ख आहे. पण हरकत नाही, देव आपल्यासमोर आव्हानं ठेवतच असतो. त्याला फक्त आपण सामोरं जायचं”, असं क्रांती म्हणाली.
“मला वाटत नाही की आमची रात्रीची झोप उडालीये, त्रास होतोय असं काही होतंय. कारण तुमची बाजू सत्याची असते, तेव्हा तुम्हाला चांगली झोप लागते. त्यामुळे यातून कसं बाहेर पडायचं, समोरच्याला त्रास न देता आपण आपली बाजू कशी मांडली पाहिजे याकडे आमचं जास्त लक्ष असतं”, असं क्रांती रेडकरनं नमूद केलं.
“देशाची सेवा करण्यासाठी…”, समीर वानखेडेंचा व्हिडीओ शेअर करत क्रांती रेडकरची पोस्ट, म्हणाली…
चित्रपटसृष्टीतून पाठिंबा आहे का?
“चित्रपटसृष्टीतून सगळे शांत राहून पाठिंबा देत आहेत. मी त्याचा आदर करते. मला कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही. वारंवार ते मेसेज करतात. त्यामुळे त्यांना धन्यवाद म्हणावंसं वाटतं”, असंही क्रांती रेडकर यावेळी म्हणाली.