प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय. दिग्रस हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं, असं वक्तव्य प्राजक्ता माळीने केलं. यानंतर राठोड समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी प्राजक्ता माळी बोलत होती.
प्राजक्ता माळी म्हणाली, “संजय राठोड यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारं हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं. यात सर्वकाही आलं.”
“हा मान मिळावा हे आमचं अहोभाग्यच आहे”
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाने साकारत असलेल्या या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा मान मला आणि माझे सहकारी अरूण दादा, समीर दादा यांना मिळावं हे आमचं अहोभाग्यच आहे,” असंही प्राजक्ता माळीने नमूद केलं.
“नाट्यकलावंताचा मंच दिग्रस शहरात उभा केला”
या कार्यक्रमात संजय राठोड म्हणाले, “या संस्थेने १९९०-९९ या १० वर्षाच्या काळात विदर्भ एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून नाट्यकलावंताचा मंच या दिग्रस शहरात उभा केला. या ठिकाणी जिल्हा प्रशासकीय भवनाची इमारत मंजूर केली. त्याचंही काम दिग्रसमध्ये सुरू आहे.”
आमदार संजय राठोडांवर करोना नियम डावलून गर्दी जमवल्याचा आरोप
दरम्यान, या कार्यक्रमात कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले. दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच आहेत का? असाही प्रश्न विचारला जातोय.