सांगली : अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी सोमवारी ही घोषणा केली. मराठी नाट्य क्षेत्रातील विष्णुदास गौरवपदक हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार समजला जातो. गौरवपदक आणि रोख रक्कम २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर या रंगभूमीदिनी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी गेली अनेक वर्षे रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रात चतुरस्रा अभिनयाचे दर्शन घडवले आहे. अनेक मराठी नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी मालिका त्यांच्या अभिनयाने लक्षवेधी ठरलेल्या आहेत.

हेही वाचा : Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”

अभिनय कलेतील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना झी गौरव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेअर, नाट्यदर्पण, मराठी ग्रंथसंग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गोरवण्यात आले आहे. याशिवाय विविध संस्थातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Priyanka Gandhi : “महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार”, व्हिडीओ शेअर करत प्रियांका गांधींचा महायुतीला इशारा

आनंदी गोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्हीसुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृतिचित्रे, अग्निपंख ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. तर तू तिथे मी, आनंदी आनंद, मुंबई-पुणे-मुंबई असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसले आहेत. अनेक मराठी-हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेले आहे. याच बरोबर त्या गेली काही वर्षे लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षणवर्गाचे संचालन करीत आहेत.

Story img Loader