काँग्रेसचे नेते साथ देत नाहीत. उलट राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरतात. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मदत केली. त्यांचे आभार मानावे तर पक्षाची नाराजी. एकूणच राजकीय अस्तित्वाच्या लढाईत करायचे तरी काय, असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नरसय्या आडम मास्तरांना पडला असेल. २००४च्या विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी आडाम यांना निवडून येण्यात मदत केली होती. पण २००९ मध्ये चित्र पालटले. शिंदे यांची कन्या प्रणिती आणि आडाम यांच्यात लढत झाली. यात प्रणिती यांनी आडाम मास्तरांचा पराभव केला होता. तेव्हापासून शिंदे आणि आडम यांचे फाटले. विडी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आडाम मास्तरांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. आडम मास्तरांच्या पाठपुराव्यामुळे कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला. या घरांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरमध्ये झाला. काँग्रेसवर असलेल्या रागातूनच आडाम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली. डाव्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधानांची कौतुक केल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली. माकपच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत आडाम मास्तरांचे समिती सदस्यत्व तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मदतीचे श्रेय भाजपला द्यावे तर स्वपक्षाची खप्पामर्जी. एकूणच आडाम मास्तरांची कोंडी झाली आहे.
‘आडम मास्तरांवरील कारवाई म्हणजे कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचे प्रदर्शन’
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन स्तुती केल्याबद्दल नरसय्या आडम यांच्यावर माकपने केलेली कारवाई म्हणजे कम्युनिस्टांच्या पोथीनिष्ठ असहिष्णुतेचे प्रदर्शन असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. आडाम केवळ विडी कामगारांच्या मुद्दय़ासाठी त्या व्यासपीठावर हजर होते . तरीही माकपने ही कारवाई केली आहे. माकप राजकीय आणि वैचारिक अस्पृश्यतेचा आग्रह धरते व अत्यंत निर्लज्जपणे अशी अस्पृश्यता आचरणातही आणते याचेच हे उघडेवाघडे प्रदर्शन आहे अशी तिखट टीका भांडारी यांनी केली.
-मुंबईवाला