येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी निवडीबाबत गेल्या ३५ वर्षांपासून चाललेल्या न्यायालयीन लढाईत अखेर कमलकिशोर काबरा यांना यश आले. गुरुवारी ते ‘आदर्श’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले आणि एकनाथ निलावार व धरमचंद बडेरा यांची सत्ता संपुष्टात आली.
१९६७ मध्ये दिवंगत बाबुराव पाटील गोरेगावकर, घनश्यामदास काबरा, नागनाथअप्पा सराफ यांच्या प्रयत्नातून आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या आदर्श महाविद्यालयाने अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केला. संस्थेचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान घनश्यामदास काबरा यांना मिळाला. त्यांच्या निधनानंतर कन्हय्यालाल दुबे यांच्याकडे सूत्रे आली. दरम्यान, संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक व्हावी, या साठी कमलकिशोर काबरा यांनी परभणी येथील धर्मादाय आयुक्तांकडे १९८२ मध्ये अपील केले होते.
काबरा यांची लढाई परभणी सार्वजनिक न्यास नोंदणी (धर्मादाय आयुक्त) ते उच्च-सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. परभणीच्या न्यास नोंदणी कार्यालयाने निवडणुकीसंबंधात दिलेल्या निकालाविरुद्ध संस्थेचे पदाधिकारी न्यायालयात गेले. मात्र, विरोधकांचे अपील अखेपर्यंत अपयशी ठरले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परभणी येथील न्यास नोंदणी कार्यालयाचा निर्णय मान्य करून विरोधकांचे अपील फेटाळले होते.
न्यायालयाच्या निर्णयावरून ९ नोव्हेंबर २०१३ रोजी मतदान घेण्यात आले व मतपेटय़ा सील करण्यात आल्या. औरंगाबाद खंडपीठात दाखल दाव्याच्या अपिलावर ९ मार्चला सुनावणी झाली. न्यायालयाने १२ मार्चला दिलेल्या निकालपत्रात आदर्श शिक्षण संस्थेची जुनी सदस्य संख्या ११२ ग्राह्य धरून न्यायालयातील इतर सर्व अपील फेटाळले व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय दिला. या निर्णयावरून ९ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी १९ मार्चला िहगोलीच्या न्यास नोंदणी कार्यालयात घेण्यात आली. यात काबरा गटाच्या २१ सदस्यांच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी बहुमतांनी निवडून आले. अध्यक्षपदी काबरा, उपाध्यक्ष अॅड. माधवराव नाईक, सचिव रमेशचंद्र बगडिया, कोषाध्यक्ष मधुकररराव दोडल, सहसचिव ज्ञानेश्वर गोठरे, तर सदस्यांमध्ये एन. एफ. बांगर, मुरलीधर मुंदडा आदींचा समावेश आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष काबरा व पदाधिकाऱ्यांनी आदर्श महाविद्यालयात येऊन पदभार स्वीकारला. या वेळी प्राध्यापक व महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

Story img Loader