टाळेबंदीच्या काळातील विषेश पक्षी निरिक्षणात जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत ‘तुरेवाला ससाणा’ आणि ‘कोतवाल कोकीळ’ या दोन नव्या पक्ष्यांची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्ष्यांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या बहार संघटनेचे पक्षी अभ्यासक वैभव देशमुख यांनी टाळेबंदीच्या काळात पक्षी निरिक्षणात वेळ खर्ची केला. या काळात त्यांना घराजवळील झडावर ‘तुरेवाला ससाणा’ (क्रेस्टेड गोषक) हा पक्षी आढळून आला. उडतांना न दिसणारा काळसर तुरा, गडद तपकिरी रंगाचे आखूड पंख, शेपटीवर चार गडद आडवे पट्टे, छातीवर बारिक रेषा व पोटाखालील भाग पांढूरका अशा स्वरूपातील या पक्ष्यातील नरमाधी दोघेही सारखेच दिसतात. मात्र, मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. तो प्रामुख्याने उत्तर भारत व ईशान्य भारतापासून खाली गोदावरी नदी खोऱ्यात आढळतो. वने व पानगळीचे जंगल हा त्याचा अधिवास आहे.

मार्च ते मे या काळात त्यांची वीण होते. तर जिल्हा न्यायालय परिसरात कोतवाल कोकीळ (फार्क‑टेल्ड ड्रोंगो कुकू) हा पक्षी आढळून आला. आकाराने कोतवाल पक्ष्यासारख्याच दिसणाऱ्या या पक्ष्याचे लांब व दुभंगलेले शेपूट हे वेगळेपण आहे. तसेच शेपटीखालील पिसे व शेपटीच्या सर्वात बाहेरील भागांवरील पिसांवर सफेदरंगी रेषा दिसून येतात. झाडाच्या पर्णविरहीत फांदीवर बसून मोठ्या आवाजात शिळ घालणाऱ्या या पक्ष्याचा आवाजातील वेगळेपण स्पष्ट दिसून येते. फळबागा, वने, आणि झुडपी जंगले हा या पक्ष्याचा अधिवास असून भारतासह बांगलादेश व श्रीलंका येथेही तो आढळतो.

बहार नेचर फाउंडेशनतर्फे जिल्हा पक्षीसूची तयार केली जाते. त्यात या दोन पक्ष्यांची भर पडली आहे. सिव्हील लाईन परिसरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या जुन्या व स्थानिक वृक्षांवर अनेक पक्षी आढळून येतात. त्यामुळे या वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत वैभव देशमुख यांनी व्यक्त केले. या विशेष पक्षी निरिक्षणाबद्दल देशमुख यांचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.