लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : गेल्या काही वर्षांत झालेला चांगला पाऊस आणि जायकवाडी तसेच निम्न दुधना प्रकल्पांतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे चालू हंगामात (२०२१-२०२२) जालना जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घनसावंगी, अंबड, परतूर आणि मंठा या तालुक्यांत हा प्रश्न प्रामुख्याने आहे. जिल्ह्यात १० लाख टन ऊस अतिरिक्त  झाला आहे.  जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड आणि परतूर या तालुक्यांतील जवळपास ४० हजार हेक्टरचा समावेश आहे. जायकवाडीमधील पाण्याची उपलब्धता आणि गोदावरी नदीवर जिल्ह्यात झालेले पाच उच्चस्तरीय बंधारे यामुळे या भागात गेल्या काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि याच कारखान्याचा भाग असलेल्या सागर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या हंगामात (२०२०-२०२१) २४ लाख टन ऊस उभा होता. त्यापैकी साडेतेरा लाख टन उसाचे गाळप झाले आणि अतिरिक्त ठरलेला सुमारे साडेदहा लाख टन ऊस कार्यक्षेत्राबाहेरील अन्य २९ कारखान्यांना पाठवावा लागला. चालू हंगामातही समर्थ आणि सागर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास २३ लाख टन उसाची उपलब्धता असून त्यापैकी सात ते साडेसात लाख टन ऊस अतिरिक्त आहे. यापैकी दोन लाख टन ऊस गूळ, बेणे इत्यादींसाठी तसेच परस्पर विक्रीसाठी जाईल. तरीही साडेपाच लाख टन ऊस अतिरिक्त ठरणार आहे.

जिल्ह्यातील समर्थ, सागर तसेच रामेश्वर हे तीन सहकारी आणि माँ बागेश्वरी व समृद्धी या दोन खासगी कारखान्यांत रविवापर्यंत जवळपास २१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापैकी ९ लाख ७८ हजार टन गाळप समर्थ आणि सागर कारखान्यांत झालेले आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस अन्य कारखान्यांना देण्याच्या संदर्भात साखर आयुक्तालयाच्या अंतर्गत तीन-चार बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत. सध्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागरच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर आणि जयहिंद साखर कारखान्यांत पाठविण्यात येत आहे. हे अंतर जवळपास २४० किलोमीटर आहे. गेल्या हंगामात तर यापेक्षा लांब अंतराच्या कारखान्यांमध्ये उसाची वाहतूक करण्यात आली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रो (कन्नड), अहमदनगर जिल्ह्यातील गंगामाई शुगर (शेवगाव), बुलढाणा जिल्ह्यातील अनुराधा त्याचप्रमाणे सिल्लोड इत्यादी कारखान्यांमध्ये जालना जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचे करार झाले आहेत. बाहेरील सहा-सात कारखान्यांमध्ये घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील समर्थ आणि सागरचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाची वाहतूक केली जात आहे. घनसावंगी, अंबड, परतूर आणि मंठा या प्रामुख्याने चार तालुक्यांतील अतिरिक्त उसाचे गाळप करण्याचा प्रश्न संबंधित प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे.

पुढील हंगामात घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत उसाचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचेच युनिट असलेल्या सागर कारखान्याजवळच नवीन कारखाना उभारण्यात येत आहे. त्यामुळे सागरची गाळप क्षमता साडेसात हजार टन होईल. नंतर त्यामध्ये आणखी अडीच हजार टन गाळप क्षमता वाढविण्यात येईल. नवीन म्हणजे विस्तारित कारखाना पुढील फेब्रुवारीपर्यंत सुूरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढील हंगामात अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर मार्ग निघेल. चालू हंगामात अतिरिक्त ऊस अन्य कारखान्यांना पाठविण्यात येत आहे.

राजेश टोपे, पालकमंत्री तथा मार्गदर्शक समर्थ साखर कारखाना

जालना जिल्ह्यात समर्थ, सागर आणि माँ बागेश्वरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात हा प्रश्न नाही. जिल्ह्यात नऊ ते दहा लाख टन ऊस अतिरिक्त ठरणार आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत अतिरिक्त ऊस तर आहेच, परंतु परतूर तसेच मंठा तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या माँ बागेश्वरी खासगी साखर कारखान्यात संपूर्ण ऊस गाळप होऊ शकणार नाही. या भागात चार लाख टनांपेक्षा अधिक ऊस अतिरिक्त आहे. निम्न दूधना आणि गोदावरी काठच्या भागात मिळणारे जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणी यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे.

गोविंद आर्दड, अध्यक्ष, जालना जिल्हा किसान सभा

अतिरिक्त उसामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत २० पेक्षा अधिक गूळ उद्योग सध्या सुरू आहेत. मागील वर्षी या उद्योगांची संख्या सात-आठ एवढीच होती. लावणी, खत, आंतरमशागत इत्यादीसाठी खर्च येत असला तरी पाण्याची उपलब्धता आणि निश्चित उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे मोठय़ा प्रमाणावर वळत आहेत. गूळ उद्योगांमुळे अतिरिक्त ऊस फार मोठय़ा प्रमाणावर कमी होत नसला तरी यासाठी हातभार निश्चितच लागत आहे. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यात ऊस वाढला असून पुढील हंगामात आणखी वाढणार आहे.  – कल्याणराव तौर, गूळ उत्पादक, उकडगाव, ता. घनसावंगी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional 10 lakh tonnes of sugarcane in jalna district zws
Show comments