विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कुंभमेळा गोड करण्यासाठी राज्य शासनाने सिंहस्थासाठी विशेष बाब म्हणून साडे तीन हजार क्विंटल साखरेचा अतिरिक्त साठा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून ही साखर वितरीत करण्यात येणार आहे. तसेच गहू, तांदळासह सवलतीच्या दरात एलपीजी सिलिंडर आणि घासलेटही उपलब्ध केले जात आहे.
सिंहस्थ कामे, साधुग्राममधील जागा वितरण, वैष्णव-शैवपंथीयांमधील वाद विवाद आदी कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा सुरूवातीपासून गाजत आहे. अनेकदा साधू-महंतांनी शासन व प्रशासनानावरही टिकास्त्र सोडले. साध्वी आणि महंत यांच्यातील वादाने वेगळेच वळण घेतले होते. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, शासनाने साधू-महंतांसाठी मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध करत कुंभमेळा गोड करण्याची तजविज केली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी नाशिक जिल्ह्याच्या नियतनाबरोबर कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त साखर पुरवठा करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यासाठीच्या १०,६८६ क्विंटल साखर पुरवठय़ाबरोबर कुंभमेळ्यासाठी १००० क्विंटल साखरेचा कोटा मंजूर केला आहे. तर जुलैसाठी १५०० क्विंटल अतिरिक्त साखर देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी १००० क्विंटल अतिरिक्त साखर पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत करण्यात येणार आहे. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी एकूण साडे तीन हजार क्विंटल अतिरिक्त साखर वाटपाची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, साधू-महंतांना सवलतीच्या दरात शासन अन्नधान्य, साखर, घासलेट व घरगुती वापराचा गॅस उपलब्ध करून देत आहे. गहू, तांदूळ व साखरेचा त्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त एलपीजी सिलिंडरही उपलब्ध करून दिले जात आहे. आधी गव्हाची मागणी झाल्यामुळे शासनाने त्याची उपलब्धता केली. मात्र, ऐनवेळी साधू-महंत गव्हाच्या पिठाचा आग्रह धरत आहे. यामुळे प्रशासन कात्रीत सापडले आहे.
कुंभमेळा गोड करण्यासाठी साखर पेरणी
विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कुंभमेळा गोड करण्यासाठी राज्य शासनाने सिंहस्थासाठी विशेष बाब म्हणून साडे तीन हजार क्विंटल साखरेचा अतिरिक्त साठा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.
First published on: 14-08-2015 at 04:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional sugar supply for kumbh mela