सोलापूर : संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघासह शेजारच्या भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघा आजी-माजी आमदारांची सत्वपरीक्षा पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या युद्धभूमीवर जोरदार घमासान झाले आहे. येत्या १७ एप्रिल रोजी सुमारे २८ हजार शेतकरी सभासद कारखान्याचा कारभार कोणाकडे सोपवायाचा, याचा कौल देणार आहेत.
आदिनाथ साखर कारखाना नेहमीच आजारी असून, अलीकडे काही वर्षांपासून बंद आहे. प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेला हा कारखाना दोन वर्षांपूर्वी बारामतीच्या पवार कुटुंबीयांनी बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली होती. परंतु, त्यात यश आले नाही. मात्र, तरीही या कारखान्याची अवस्था बिकटच असून, त्यास आर्थिक ‘टॉनिक’ मिळण्याची शक्यताही धूसर आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आर्थिक पाठबळ उभे करण्याचा शब्द देत स्वतः कारखान्याचा गळीत हंगामात धुराडे पेटविण्यासाठी आले होते. परंतु, त्यातून हाती काहीच न लागता उलट निराशाच आली होती.
यावर आदिनाथ साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होणे अशक्य असल्याचे बोलले जात असताना कारखान्याची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार जयवंत जगताप यांची ताकद पाठीशी घेऊन कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर त्यांना अपक्ष माजी आमदार संजय शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्यासह बारामती ॲग्रो कंपनीचे सुभाष गुळवे यांच्या मदतीने आव्हान दिले आहे. यात त्यांच्या मदतीला माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते हे धावून आले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या असून, त्यातून प्रचाराची पातळी घसरल्याचे दिसून येते.