रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राजगड हा शरद पवार यांच्या आवडीचा जिल्हा असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच त्यामुळे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, असं मत अदिती तटकरे यांनी व्यक्त केलं. आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. यावेळी त्या बोलत होते.
अदिती तटकरे म्हणाल्या, “रायगड जिल्हा शरद पवार यांच्या आवडीचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. चांगली आरोग्य सुविधा, चांगल्या नागरी सुविधा पुरवण्याचे काम आम्ही करत आहोत. मच्छीमार बांधवांसाठी उपक्रम राबवले जात आहे. याच कामाच्या जोरावर पक्ष संघटना बळकट करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू.”
“राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज रायगडात आली आहे. आम्ही या दौऱ्याची वाट पाहत होतो. सुरुवात रायगडातून झाली नसेल, पण आम्ही सांगता दिमाखदार करू,” असे आश्वासन रायगडच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे म्हणाले, “शरद पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या भागाचा नेहमीच विचार केला आहे. दि. बा. पाटील यांनी एक मोठा लढा भूमिपुत्रांसाठी दिला आणि इथल्या भूमीपुत्रांना न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्यामुळे येत्या काळातही भूमीपुत्रांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल.”
“विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्ण करुन ही यात्रा आता रायगड येथे पोहोचली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संघटनेला एक उर्जा मिळेल,” असा विश्वासही खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?”, जयंत पाटलांचा हल्लाबोल
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे, रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर, सुदाम पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, युवती जिल्हाध्यक्षा सायली दळवी, विद्यार्थी कोकण अध्यक्ष किरण शिखरे, रायगड विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष मनोज भगत, पनवेल तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, महिला तालुकाध्यक्षा हेमांगी पाटील, उरण शहराध्यक्ष गणेश नलावडे आदी उपस्थित होते.