Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जात आहेत. काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत? तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात १५०० रुपये कधीपर्यंत जमा होतील? यासंदर्भातील महत्वाची माहिती आज (१६ सप्टेंबर) महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारत जाणार आहे का? असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच ३१ ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल ५२ लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…
आदिती तटकरे यांनी पुढे म्हटलं की, “सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण योजनेची मुदत कधीपर्यंत असणार?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “पहिल्या टप्प्यातील मुदत ही १ जुलै ते १ ऑगस्ट होती. या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरुच राहणार आहेत. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरीत करणार आहोत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत. त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल. तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे, तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरीत करण्यात येईल”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.