अलिबाग : राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश झाल्यानंतर रायगडमधील राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यास जिल्ह्यातून विरोध होत आहे. जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या सर्व आमदारांनी आदिती यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शवला असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी गुरुवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. पहिल्याच फटक्यात ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली त्यात श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्री पद येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रायगडमधील शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यास रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या सर्व सहा आमदारांनी विरोध केला असल्याची माहिती आमदार गोगावले यांनी दिली. ‘‘पूर्वी आम्ही सत्तेत शिवसेना आणि भाजप असे दोनच पक्ष होतो. मंत्रीपदाच्या शर्यतीत असूनही मी थांबलो. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही असे गोगावले यांनी स्पष्ट केले. गोगावले यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात आगामी काळात तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

विरोध का?

महाविकास आघाडी सरकार असताना रायगड जिल्ह्यातील उठावाला आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद कारणीभूत ठरले होते. तटकरे जिल्हा नियोजनाचा निधी देत नाहीत, मानसन्मान देत नाहीत. आमदारांच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असे आक्षेप शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी घेतले होते. त्यामुळे तटकरे यांच्या विरोधात मोहीमही राबवण्यात आली होती. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी उठाव करत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi tatkare should not be the guardian minister of raigad says mla bharat gogawale zws
Show comments