अलिबाग: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रायगड जिल्हयात ठिकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. परंतु शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यात लागलेले बॅनर सर्वांनाच बुचकळयात टाकणारे आहेत. या बॅनरची चर्चा संपूर्ण महाड तालुक्यात सुरू आहे.
महाड एमआयडीसी परीसरातील आसनपोई गावच्या नाक्यावर हे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर आदिती तटकरे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सुनील तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचे फोटो पहायला मिळत आहेत. या बॅनरवर महाविकास आघाडी असा उल्लेख करण्यात आला आहे.
आणखी वाचा-एकदाचं ठरलं! सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणार महापालिकांच्या निवडणुका
खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे हे नुकतेच महायुतीमध्ये सहभागी झालेले असताना विचित्र युती दाखवणारे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून गोगावले- तटकरे संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. असे असताना या बॅनरमुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला आहे. हा बॅनर लावला कुणी आणि त्यामागचा त्याचा हेतू काय असावा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.