Aditya Thackeray Mohammed Shami and Javed Akhtar : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रविवारी (२३ मार्च) खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आधी टिच्चून मारा करत पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आणला आणि त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत सामना खिशात घातला. या सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला एकही बळी मिळाला नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर त्याच्यावर टीका झाली. एका युजरने तो मुस्लीम असल्यामुळे पाकिस्तानविरोधात त्याने विकेट घेतली नाही अशी पोस्ट केली होती. या पोस्टवर आमदार व शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक, कवी व चित्रपट पटकथाकार जावेद अख्तर यांना देखील ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटना पाहून आदित्य ठाकरे यांनी देशात वाढत असलेल्या मुस्लीमद्वेष व भाजपाच्या राजकारणावर बोट ठेवलं.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत याचे हे उदाहरण आहे. मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते; का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे. दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे! पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला. ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना ‘पाकिस्तानला जा’ असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री (अनुराग ठाकूर) स्वतः रस्त्यावर ‘देश के गद्दारों को….’ च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदीबरोबर गप्पा मारत होते. मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण?”

आदित्य ठाकरेंची अनुराग ठाकूरांवर टीका

आदित्य ठाकरे म्हणाले, “विचार करा, जर तो नेता भाजपाचा नसता, तर काय झालं असतं? त्याच्याविरोधात आंदोलनं झाली असती. गुन्हे दाखल झाले असते. त्याला देशविरोधी ठरवले गेले असते! आणि त्यालाही ‘पाकिस्तानला जा’ असे म्हटले असते! त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच. दुर्दैवाने, हीच भाजपची नीती आहे. देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा. आत्ताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. यांचे नेते, या नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात. एकत्र बसून सामने पाहतात.”

आदित्य ठाकरे नेमंक काय म्हणाले?

वरळीचे आमदार म्हणाले, “हे लोक (भाजपा) आमच्या तरुणांना मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात. आणि हो, जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा याच भाजपशासित भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र सगळं माहित असूनही त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट सामना खेळवले. निवडणुका झाल्याने भाजपा आता हिंदूना विसरली आहे, देशभक्तीही विसरली आहे, की मग आता भाजपाच्या देशभक्तीचा ‘टाइम प्लीज’ आहे? जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूबरोबर आनंद घेतानाचे फोटो दाखवा आणि विचारा, हे त्यांना मान्य आहे का? आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी निवडणुकीपुरती नाही. देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करू, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही.”

Story img Loader