काश्मिर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात अनेक काश्मिरी पंडितांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत शिवसेनेने ठोस भुमिका घेतली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे.
काश्मिरी पंडितांचा विषय महत्वाचा
मुंबई हरित योद्धा या उपक्रमाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणुका येतात आणि जातात. मात्र, काश्मिरी पंडितांचा विषय महत्त्वाचा आहे. इतक्या वर्षानंतरही काश्मीरमधील चित्र बदलले नाही. महाराष्ट्राचे दरवाजे काश्मिरी पंडितांसाठी नेहमीच खुले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. काश्मिरी पंडितांवर बनलेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल’बद्दल मी काही बोलणार नाही. यबाबत ठोस पावले उचलण्यात येईल. तसेच ठोस कारवाईही करण्यात येईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या
गेल्या महिन्यात राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची सरकारी कार्यालयात घसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर अलिकडेच एका बॅकेच्या अधिकाऱ्याचीही दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांकडून करण्यात येत आहे.