मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात आमदार आदित्य ठाकरे यांचाही समावेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राजभवनाकडून आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश असून, त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देणार याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील सदस्यानं प्रथमच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपावर दबाव ठेवण्यासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आलं होतं. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं प्रचारात सांगत होते. मात्र, निवडणूक निकालानंतर राज्यातील सत्ताचित्र बदललं. भाजपानं मुख्यमंत्रीपदाची वाटणी होणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केली. या प्रक्रियेत आदित्य यांचं नाव मागे पडलं आणि ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य राज्याच्या राजकारणात उतरला. आदित्य यांचे वडील उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आदित्य यांच्या नावाची चर्चा पूर्णपणे थांबली.

आमदार आणि कॅबिनेट मंत्री

आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले आहे. आमदार झाल्यानंतर थेट मंत्रिमंडळात आणि थेट कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. आदित्य ठाकरे हे राजकारणात नवखे असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार की नाही, याविषयी साशंकता होती. पण, ती खोटी ठरली आहे. आता आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणतं खातं याची चर्चा सुरू आहे. आदित्य यांना शहरांचा विकास आणि पर्यावरणाविषयी जवळीकता आहे. त्यामुळे या दोन्ही खात्यापैकी त्यांच्याकडे एक खातं दिलं जाऊ शकतं. मुंबई महापालिकेेच्या माध्यमातून आदित्य यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यांच्याकडे नव्या कल्पना आहे. त्यामुळे या खात्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray cabinet minister ministry expansion maharashtra government bmh