दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली शिवसेना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : दुष्काळाचा प्रश्न गांभीर्यानेच हाताळायला हवा. त्यात राजकारण होऊ नये. शेतक ऱ्यांनीही निराश होऊन आत्महत्या करू नयेत, प्रत्येक संकटाच्या काळात शिवसेनेची केवळ आठवण करावी. अशा प्रत्येक वेळी शिवसेना मदतीसाठी कर्तव्य भावनेने धावून येईल, अशी ग्वाही देत युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी भागात शेतक ऱ्यांशी संवाद साधला आणि पाण्याच्या टाक्यांसह मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला.

यंदा राज्यात सर्वत्रच दुष्काळी संकट ओढवले आहे. सोलापूर जिल्ह्य़ातही दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. दुष्काळाशी सामना करताना शेतक ऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात पिके वाया गेली असून ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या मंगळवेढय़ातदेखील कर्नाटक व तेलंगणातून ज्वारी आयात करावी लागत आहे. आतापर्यंत शासनाने केवळ दुष्काळ जाहीर केला असून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना अद्यापि अमलात आल्या नाहीत. मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचे टँकर येत नाहीत. जनावरांना जगविण्यासाठी चारा छावण्यांचा आधारही दिला जात नाही. अशा परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोलापूर ग्रामीणच्या दुष्काळी भागात धाव घेऊन तेथील शेतकऱ्यांना अल्पसा मदतीचा हात दिला. आज सकाळी त्यांनी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर पोखरापूर येथे भेट दिली असता त्यांना तेथील कोरडय़ा तलावाचे दर्शन झाले. १९९६ साली हा तलाव शासनाने मंजूर केला होता, परंतु हा तलाव नेहमीच पाण्याविना कोरडाच राहिला आहे. त्यास तलाव म्हणायचे का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

यासंदर्भात मुंबईत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नंतर मोहोळ तालुक्यातील सारोळे या गावी भेट देऊन तेथील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. या वेळी शेतक ऱ्यांना पिण्याचे पाणी साठविण्यासाठी फायबरच्या टाक्यांसह जनावरांसाठी सुग्रास चारा देण्यात आला. पाणी आणण्यासाठी टँकरही उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कुठलाही बडेजाव न स्वीकारता त्यांच्याबरोबर जमिनीवरच बैठक मारत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. या वेळी त्यांनी गिरीधर वैजिनाथ मोटे या शालेय मुलाला आपुलकीने जवळ घेतले. शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत आपल्या अडचणी मांडल्या.

या वेळी ठाकरे म्हणाले,की दुष्काळाची भीषणता अधिक आहे. नागपूर, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी भागांचा आपण दौरा करून तेथील दुष्काळी परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. सर्वत्रच पाण्याच्या टंचाईसह पशुखाद्य व चारा टंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या कुटुंबीयांसह मुक्या जनावरांना पोसायचे कसे, याची विवंचना लागली आहे. जगावे कसे, हा प्रश्न पडला आहे. दुष्काळात रडत बसण्यापेक्षा  शेतक ऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे, आत्महत्या करू नयेत. अन्नदाता अडचणीत असताना सर्वानी त्याच्यासोबत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मोहोळ तालुक्यासह माढा व बार्शी भागातही आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन तेथील शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी टाक्या व जनावरांसाठी चारा आणि सुग्रास उपलब्ध करून दिले. त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, सोलापुरातील सेना नगरसेवक अमोल शिंदे आदी उपस्थित होते.