मागील काही महिन्यांत वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन असे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर राज्यातून बाहेर गेलेले हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आमचे सरकार येण्याआधीच वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणार, हे ठरले होते, असा दावा केला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम सांगितला आहे. फडणवीस खोटं बोलत आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा >>> फडणवीसांची मोठी घोषणा! पुण्यात उभा राहणार २००० कोटींचा प्रकल्प, मोदी सरकारकडून ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ला मंजुरी
महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर १५ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदान्त फॉक्सकॉच्या संचालकांना एक पत्र लिहिले होते. तुम्ही महाराष्ट्रात या, आम्ही तुमचे स्वागत करतो, असे शिंदे या पत्रात म्हणाले होते. १५ जुलै २०२२ साली एका समितीची स्थापना झाली. त्यानंतर ३५ हजार कोटी रुपयांचे अनुदान तसेच इतर सुविधा या प्रकल्पाला देण्यात आल्या. आपण गुजरातच्या तुलनेत १० हजार कोटी रुपये जास्त अनुदान दिले होते. मात्र तरीदेखील हा प्रकल्प राज्यात आला नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे २६ जुलै २०२२ रोजी वेदान्त फॉक्सकॉनचे कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीचे पुरावे आहेत. वेदान्त फॉक्सकॉनने सप्टेंबर २०२०-२१ मध्येच गुजरातमध्ये जायचं ठरवलं असेल तर मग या बैठका म्हणजे टाईमपास होता का? बाहेर चहा बिस्कीट भेटत नाही, त्यासाठी आम्ही तुमच्या मंत्रालयात येतो, असं काही होतं का? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केले.
हेही वाचा >>> “तुम्ही त्यांचं नाव सांगाच,” आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “दादागिरी फक्त…”
ही बैठक झाल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी वेदान्त फॉक्सकॉनला राज्यात येण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला गेला. या सर्व घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत, ते चुकीचे आहे, हे स्पष्ट झाले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.