वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्पदेखील गुजरातमध्ये गेल्यानंतर शिंदे गट-भाजपा सरकारवर सडकून टीका केली जात आहे. राज्य सरकार राज्यात नवे प्रकल्प आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवला जात आहे. असे असताना आता उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मागील चार महिन्यांमध्ये राज्यात येणारे ४ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. गुंतवणूकदारांना विद्यमान सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा >>> किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर आक्रमक, म्हणाल्या “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…”
टाटा एअरबस प्रकल्पतरी महाराष्ट्रात आणावा, असे आम्ही सत्ताधाऱ्यांना सांगत होतो. एकीकडे कृषी क्षेत्राचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही आपल्या हातातून चार प्रकल्प गेले आहेत. पहिला प्रकल्प हा वेदान्त फॉक्सकॉनचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात सांगितले होते, की हा प्रकल्प राज्यात येईल. या प्रकल्पाविषयी ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या. मात्र सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला. दुसरा प्रकल्प हा बल्क ड्रग पार्क हा आहे. आपल्याकडे ३९४ फार्मसी कॉलेज आहेत. मात्र बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प चार अन्य राज्यांना देण्यात आला. सत्ताधारी मात्र हा प्रकल्प राज्यात आणू शकले नाहीत. मेडिकल डिव्हाईस पार्क हा तिसरा प्रकल्पदेखील राज्यातून गेला. हा प्रकल्प औरंगाबादेत होणार होता. चौथा प्रकल्प हा टाटा एअरबस हा आहे. हा चौथा प्रकल्पही महाराष्ट्रातून गेला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>> किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या “एक जरी गाळाधारक…”
जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आमचा केंद्र सरकारशी चांगला संवाद सुरू होता. मात्र सध्याचे घटनाबाह्य सरकार आल्यापासून सरकारचे एक इंजिन फेल झालेले आहे. याच कारणामुळे हे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. कदाचित तिकडच्या राज्यांतील निवडणुकांमुळे हे झाले असावे. कोणत्याही उद्योजक तसेच गुंतवणूकदाराला या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याचे माझ्या कानी आले आहे. दोन-तीन आमदारांमध्ये जगजाहीर भांडण सुरू आहे. महाराष्ट्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, ते चांगले नाहीये. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे, असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.