एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी भाजपा आणि मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती, असा गौप्यस्फोट केला आहे. हे जर खोटे असेल तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असेदेखील केसरकर यांनी जाहीर केले आहे. केसरकरांच्या याच दाव्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्ष बदललेल्या आणि चौथ्या पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा यावर आपण विचार केला पाहिजे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा >>> तेजस ठाकरे राजकारणात खरंच सक्रीय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “तो…”
“अगोदर तीन पक्ष बदलून झालेले आणि आता चौथ्या पक्षात पदार्पण करण्यास उत्सुक असेलेल्या लोकांनावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार केला पाहिजे. गौप्यस्फोट करणारे अनेक कारणं देत आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान एका सभेतून दुसऱ्या सभेमध्ये जाईपर्यंत यांची कारणं बदललेली असतात. कोणालाही ही गद्दारी आवडलेली नाही. अनेकवेळा लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. पण राजीमाना देण्याची नम्रता त्यांच्यात होती. हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे विषय बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत राहायचे हा प्रयत्न सुरू आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा, पण नारायण राणेंमुळे फिसकले; दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट
“तुम्हाला तिथे राहायचे असेल तर राहा. मात्र आमदारकीचा राजीनामा द्या. निवडणुकीला सामोरे जा. जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल. ही गद्दारी चुकीची आहे, असे ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहेत. आमचे या लोकांवर प्रेम होते. विश्वास होता. हा विश्वास त्यांनी गमावलेला आहे, ” असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> “माझ्यासमोर ज्या याचिका…” शिंदे गट-उद्धव ठाकरेंतील संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचे विधान
दीपक केसरकर काय म्हणाले होते?
“उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मी माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाला जास्त महत्त्व देतो. त्याच वेळेला त्यांनी आपल्या पदाचा त्याग करायचे ठरवले होते. पुढच्या १५ दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. मात्र दरम्यानच्या काळात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. निलंबन झाल्यानंतर भाजपाकडून निरोप आला होता. आपली बोलणी सुरू आहे. असे निलंबन योग्य नाही, असे मत भाजपाने व्यक्त केले होते. पुढे कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे उद्धव ठाकरे यांना आवडले नाही. याच कारणामुळे ही बोलणी थांबली,” असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. यातील एकही शब्द खोटा निघाला तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असे देखील दीपक केसरकर म्हणाले.